अध्यक्षांचा राजीनामा, ‘एचडीएफसी’ घसरण
जवळपास 8 टक्क्यांच्या घसरणीची नोंद
वृत्तसंस्था/मुंबई
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या समभागांमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांच्या अचानक राजीनाम्यानंतर बँकेच्या समभागांनी एका वर्षातील नीचांक गाठला. बाजारातील जाणकारांच्या मते, जोपर्यंत परिस्थिती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत संचालक मंडळ आणि व्यवस्थापन यांच्यातील समन्वयाबद्दल उपस्थित केलेले प्रश्न स्टॉकवर दबाव टाकत राहू शकतात.
सुरुवातीच्या व्यवहारात एचडीएफसी बँकेचे समभाग जवळपास 8.6 टक्क्यांनी घसरून 770 रुपयांवर आले. सकाळी 9:30 वाजेपर्यंत सुमारे 5.28 कोटी समभागाचा व्यवहार झाला, ज्याचे एकूण मूल्य 4,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. या कालावधीत, निफ्टी 50 सुमारे 2 टक्क्यांनी खाली होता, तर निफ्टी बँकेत 2.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. या शेअरने गेल्या एका महिन्यात 8 टक्के आणि 2026 मध्ये आतापर्यंत 15 टक्के नुकसान सोसले आहे.
बँक व्यवस्थापनाने काय सांगितले?
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन म्हणाले की, प्रत्येक संस्थेत लहान-मोठ्या समस्या असतात, पण त्या सोडवल्या जातात. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणत्याही प्रकारचा सत्तासंघर्ष सुरू नाही. त्यांनी असेही सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी तपासणी करत असून बँकेची स्थिती ठीक आहे. संस्थेच्या रचनेचा पुढील आढावा योग्य वेळी दिला जाईल. दरम्यान, केकी मिस्त्राr म्हणाले की, बँकेशी संबंधित कोणतीही मोठी समस्या नाही आणि राजीनामा कोणत्याही नियमांच्या अंमलबजावणीशी संबंधित चिंतेमुळे नाही. जेपी मॉर्गनच्या मते, ‘मूल्ये आणि नैतिकतेमधील असमतोल‘ हे कारण देत अतानु चक्रवर्ती यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे संचालक मंडळ आणि व्यवस्थापन यांच्यातील ताळमेळाबद्दल चिंता वाढली आहे. ‘जरी त्यांनी कोणताही गैरप्रकार केल्याचा आरोप केला नसला तरी, जोपर्यंत परिस्थिती स्पष्ट होत नाही तोपर्यंत नकारात्मक प्रतिमेमुळे शेअरवर दबाव येऊ शकतो,’ असे ब्रोकरेजने म्हटले आहे.