सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी सीजी पॉवरची गुंतवणूक
वृत्तसंस्था /मुंबई
ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सीजी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन या कंपनीने आगामी काळामध्ये सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील पाच वर्षाच्या काळामध्ये याकरिता कंपनी 6592 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उपलब्ध होते आहे. या बातमीने कंपनीचा समभाग शेअरबाजारामध्ये तेजीत असताना दिसला आहे. कंपनीचा समभाग 386 रुपयांवरून 470 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 71610 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सीजी पॉवर कंपनीने भारत सरकारकडे इलेक्ट्रीक आणि आयटी मंत्रालयाकडे अर्ज सादर केला आहे. या अर्जात कंपनी सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. सरकारने देशामध्ये सेमी कंडक्टर निर्मितीकरिता प्रोत्साहन म्हणून सवलत देण्याची घोषणा केली होती. या सवलतीचा लाभ उठविण्यासाठी सीजी पॉवरने सेमी कंडक्टर निर्मितीत लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पुढील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये 6592 कोटी रुपयांची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या बातमीनंतर राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात 15 दशलक्ष समभागांची ग्राहकांनी खरेदी केली होती. याचप्रमाणे 37 लाख समभागांच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी इच्छा दर्शविली असल्याचे दिसून आले आहे. सदरचा सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प भागीदारीतून उभारण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत.