CETP पाईपलाईचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या दिशेने! 1300 मीटरची पाईपलाईन बदलली
पुढील टप्प्यातील काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे
चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सीईटीपीतून करंबवणे खाडीत सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्याची पाईपलाईन बदलण्याचे पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जीर्ण झालेली ही पाईपलाईन ग्रामस्थांच्या मागणीनुसार तब्बल वीस वर्षांनी बदलून नव्याने टाकण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे तेराशे मीटरची पाईपलाईन बदलण्यात आली असून पुढील टप्प्यातील काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचे रासायनिक सांडपाणी सीईटीपीमध्ये घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पातील प्रक्रियेनंतर ते सांडपाणी 630 मि.मी. व्यासाच्या एचडीपीई पाईपलाईनमधून लोटे ते करंबवणे खाडीत सोडले जाते. त्यासाठी सुमारे साडेसात कि.मी.ची पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
साधारणपणे वीस वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली ही पाईपलाईन सांडपाण्यामुळे आता जीर्ण झालेली आहे. अलीकडच्या काळात ही पाईपलाईन ठिक-ठिकाणी फुटत होती. तसेच गळतीही लागत होती. परिणामी सांडपाणी वाहून गेल्यानंतर स्थानिकांकडून तक्रारी येत होत्या. पाईपलाईन दुरुस्तीमध्येही वेळ जात होता.
प्रसंगी पाईपलाईन नादुरुस्त झाल्यानंतर तिच्या दुऊस्तीसाठी एमआयडीसीला ‘शट डाऊन’ घ्यावे लागत होते. यामध्ये उद्योजकांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते. परिणामी सांडपाणी पाईपलाईन बदलण्याची मागणी स्थानिकांसह उद्योजकांतूनही केली जात होती. त्यामुळे एमआयडीसीने पाईपलाईन बदलण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यातून अडीच कि.मी. लांबीची पाईपलाईन बदलण्याचे काम मंजूर झाले.
गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे. तसे पाहिले तर हे काम कठीण आणि तितकेच जिकरीचे असतानाही पहिला टप्पा आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. साधारणपणे पहिल्या टप्प्यात सुमारे तेराशे मीटरची पाईपलाईन बदलण्याचे काम आता अंतिम टप्प्यात येत आहे. तर उर्वरित पाईपलाईन बदलण्याचे काम आता पावसाळ्यानंतर हाती घेतले जाणार आहे. पाईपलाईन बदलून नव्याने टाकण्यात येत असल्याने आता बऱ्याचशा समस्या मिटणार आहेत.