सीईटी-सक्षमला 10 लाख रुपये अनुदान
जि. पं. सीईओ राहुल शिंदे : नाविन्यपूर्ण उपक्रम
बेळगाव : ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राबविण्यात आलेल्या सीईटी सक्षम उपक्रमाला 10 लाख रुपये अनुदान मिळाले आहे. पदवीपूर्व शाळांमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी अनुदान जाहीर झाले आहे. जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व पदवीपूर्व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सक्षम हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ लागला आहे. विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सीईटी नेट परीक्षेच्या तयारीसाठी सीईटी सक्षम हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमासाठी शासनाने 10 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सीईटी सक्षम उपक्रमाच्या विश्लेषण आणि डाटा संकलन व विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक मूल्यमापनाचे विश्लेषण आणि संकलन केले जाणार आहे. अंतर्गत सीईटी-नीट परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी सक्षम हा उपक्रम अधिक सक्षम करीत आहे. शिवाय भविष्यात स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाताना कौशल्य आणि मानसिक बळ देण्यासाठी हा उपक्रम आधार ठरत आहे. शिमोगा आणि विजापूरसह 7 जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पथकांनी बेळगावला भेट देऊन ‘सीईटी-सक्षम’ उपक्रमाची माहिती करून घेतली होती. बेळगाव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाने राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.