किणये महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा सोहळा भक्तीमय वातावरणात
लक्षणीय कलश मिरवणूक : पंचक्रोशीतील अनेक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
वार्ताहर/किणये
किणये गावातील जागृत महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त गावात दिवसभर कडक वार पाळणूक करण्यात आली होती. सकाळी मंदिरात टाळ मृदंगाच्या गजरात काकड आरती झाली. त्यानंतर अभिषेक व पूजा करण्यात आली. दर्शनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शुक्रवारी सकाळी गावात पारंपरिक वाद्यांच्या गजरात कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला डोक्मयावर कलश घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मिरवणुकीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत होते. यावेळी गावातील सर्व देवदेवतांची पूजा-अर्चा करण्यात आली. मिरवणूक सुरू असताना वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात विविध अभंग म्हटले. तसेच महालक्ष्मी देवीचा जयघोष करण्यात आला. यामुळे अवघी किणये नगरी दुमदुमली होती.