‘नीट’बाबत केंद्राची कारवाई विद्यार्थ्यांना सुरक्षित करणारी
मुख्यमंत्री सावंत यांचा विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी व्हिडिओ
त.भा. प्रतिनिधी
पणजी : नीट परीक्षेच्या संदर्भातील घडामोडींवर भारत सरकारने घेतलेल्या तत्पर भूमिकेचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, शुक्रवारी स्वागत केले. यासोबतच, त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना एक संदेश जारी करत निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्पष्ट केले आहे की, पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ (कोणतीही गय न करण्याची) भूमिका घेतली जाईल. भारत सरकारने दोषींवर त्वरित कारवाई केली आणि लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ नये म्हणून पुनर्परीक्षेचा निर्णय घेतला, हे अत्यंत महत्वाचे आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आमच्या परीक्षांची विश्वासार्हता सुरक्षित ठेवली जाईल आणि आमच्या तरुणांच्या महत्त्वाकांक्षांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल. आता निकाल जाहीर झाले असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, भविष्यातील परीक्षा आणखी जास्त पारदर्शकता आणि कडक सुरक्षा उपायांसह आयोजित केल्या जातील. मी प्रत्येक विद्यार्थ्याला आवाहन करतो की, तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा आणि स्वप्नांचा पाठपुरावा करत राहा. विकसित भारताच्या उभारणीत गोव्याचे तरुण कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने अव्वल स्थान राखतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या सदिच्छा नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत.”
देशाचे भविष्य तरुणांच्या बुद्धिमत्तेवर आणि त्यांच्या दृढनिश्चयावर अवलंबून असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आणि कठोर परिश्रम व चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे सर करण्याचे आवाहन केले.