जुने गोवे, भोम महामार्गासाठी केंद्राकडून 1060 कोटी मंजूर
मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय मंत्री गडकरींच्या निर्णयाचे स्वागत : उड्डाणपूल, समांतर पूल, सर्वीस रोडसह चौपदरी महामार्ग
पणजी : जुने गोवे, भोम ते कुंडई दरम्यान 7 कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला केंद्र सरकारने अखेर आर्थिक मंजुरी दिली. केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या करीता 1060.21 कोटी रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जोरदार स्वागत केले आहे. पणजी - बेळगाव अनमोडमार्गे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणातील जुने गोवे ते कुंडई हा 7 कि.मी.चा भाग अत्यंत अरुंद आहे. त्याच्या विस्तारीकरण करण्यासाठी आतापर्यंत सा. बां. खात्याने प्रयत्न केले. परंतु स्थानिक ग्रामस्थांनी केलेला जोरदार विरोधामुळे या रस्त्याचे रुंदीकरण गेली चार वर्षे अडून बसले आहे. या रुंदीकरणासाठी सुमारे 600 कोटी रुपयांचा खर्च अंदाजित व्यक्त केला होता. तेथील ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता आता त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्या करीता 1060.21 कोटी रुपयांच्या खर्चास सोमवारी मंजुरी दिली. या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिली.
मुख्यमंत्र्यांनी सकाळीच ‘एक्स’ या समाज माध्यमांद्वारे नितीन गडकरी यांच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. खर्चाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात हे काम सुरु करणे हे सरकारसमोर फार मोठे आव्हान आहे. भोम येथे उड्डाणपूल, बाणास्तारी येथे आणखी एक समांतर पूल आणि खोर्ली येथील रस्त्याचे चौपदरीकरण वगैरे सर्व कामे हाती घेताना काही घरे, दुकाने पाडावी लागणार आहेत. केंद्राने प्रकल्प मंजूर केला असला तरी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांची पर्यायी व्यवस्था करणे हे देखील फार मोठे आव्हान ठरते. प्राप्त माहितीनुसार, 4.250 कि.मी.च्या उड्डाणपुलाचा एकंदरित प्रकल्पात समावेश आहे. पूर्वाश्रमीचा राष्ट्रीय महामार्ग 6-अ व आताचा राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पणजी - बेळगावचा एकूण 155 कि.मी.च्या महामार्गातील खोर्ली ते कुंडई या दरम्यानच्या 7 कि.मी.च्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा समावेश आहे. सध्या या महामार्गावर वाढती वाहन संख्या असल्यामुळे दररोज सकाळ - संध्याकाळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते. चार पदरी उड्डाणपूल आणि सर्व्हिस रस्ता प्रत्येकी दोन्ही बाजूनी 7 मीटर रुंदीचा केला जाणार आहे.
तानावडे यांनी मानले गडकरींचे आभार
दरम्यान, जुने गोवे ते कुंडई दरम्यान रस्ता प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 1060 कोटी रुपये मंजूर केल्याच्या निर्णयाचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी जोरदार स्वागत केले. या प्रकल्पामुळे खोर्ली, भोम आदी भागात वारंवार होत असलेली वाहतूक कोंडी सुटेल, अशी आशा तानावडे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारचे सातत्याने गोव्याच्या विकासासाठी मिळणारे सहकार्य व पाठिंब्या बद्दल तानावडे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.