For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्य विभागाचा डाव 266 धावांत समाप्त

07:20 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
मध्य विभागाचा डाव 266 धावांत समाप्त
Advertisement

रिंकू सिंगचे अर्धशतक : मुकेशकुमार, सरकारचे  प्रत्येकी 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

2026 च्या क्रिकेट हंगामातील येथे रविवारपासून खेळविण्यात आलेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात मुकेशकुमार आणि अभिजित सरकार यांच्या भेदक गोलंदाजीसमोर पूर्व विभागाने मध्य विभागाला पहिल्या डावात 266 धावांवर रोखले. मध्य विभागातर्फे रिंकू सिंगने एकाकी लढत देत अर्धशतक (60 धावा) झळकवले.

Advertisement

या सामन्यात पूर्व विभागाने नाणेफेक जिंकून मध्य विभागाला प्रथम फलंदाजी दिली. पूर्व विभागाच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर मध्य विभागाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. सलामीचा अमन मोखाडे आणि कुणाल चंदेला हे दोन फलंदाज लवकर बाद झाले. मोखाडेने 8 तर चंदेलाने 6 धावा जमविल्या. कर्णधार रजत पाटीदार 12 धावांवर असताना मुकेशकुमारच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. उपाहारापर्यंत मध्य विभागाने पहिल्या डावात 3 बाद 81 धावांपर्यंत मजल मारली होती.

खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मध्य विभागाने आणखी दोन गडी गमाविताना 97 धावांची भर घातली. चहापानावेळी मध्य विभागाने 57 षटकात 5 बाद 178 धावा जमविल्या. आर्यन जुयलने 113 चेंडूत 6 चौकारांसह 46 धावा जमविल्या. मुकेशकुमारने त्याला झेलबाद केले. मोहम्मद शमीने यश राठोडला बाद केले. त्याने 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. हर्ष दुबे आणि रिंकू सिंग यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरला. या जोडीने 6 व्या गड्यासाठी 55 धावांची भर घातली. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये रिंकू सिंगने आपले अर्धशतक 71 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. मुकेशकुमारने त्याला झेलबाद केले. त्याने 8 चौकारांसह 60 धावा केल्या. हर्ष दुबेने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 27, सारांश जैनने 1 चौकारासह 13, आर्यन पांडेने 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या यश ठाकूरने आक्रमक फटकेबाजी करत 26 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 30 धावा जमविल्याने मध्य विभागाला 266 धावांपर्यंत मजल मारता आली. मध्य विभागाचा पहिला डाव 80.1 षटकात 266 धावांवर आटोपला. मुकेशकुमार आणि अभिजित सरकार यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद कुनेन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक - मध्य विभाग प. डाव 80.1 षटकात सर्वबाद 266 (रिंकू सिंग 60, आर्यन जुयल 46, राठोड 27, दुबे 27, पांडे 22, यश ठाकूर नाबाद 30, अवांतर 14, मुकेशकुमार, अभिजित सरकार प्रत्येकी 3 बळी, मोहम्मद शमी व मोहम्मद कुनेन प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :

.