मध्य विभागाचा कर्णधार रजत पाटीदार
वार्ताहर, नवी दिल्ली
2026 क्रिकेट हंगामातील चालु महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मध्य विभाग संघाच्या कर्णधारपदी रजत पाटीदारची निवड करण्यात आली असून रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
आयपीएल स्पर्धेत आरसीबीचे नेतृत्व करणाऱ्या रजत पाटीदारने आपल्या संघाला सलग दोनवेळा जेतेपद मिळवून दिले आहे. मध्य विभाग संघामध्ये फिरकी गोलंदाज सारांश जैनला संधी देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय कसोटी संघामध्ये सारांश जैनचा समावेश करण्यात आल्याने त्याला दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे. सारांश जैनची भारतीय कसोटी संघामध्ये पहिल्यांदाच निवड झाली असून तो लंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आपले पदार्पण करणार आहे. दुखापतीमुळे अष्टपैलु वॉशिंग्टन सुंदरला या मालिकेसाठी वगळण्यात आल्याने जैनला कसोटी पदार्पणाची संधी उपलब्ध झाली आहे.
भारत आणि लंका यांच्यातील पहिली कसोटी 15 ऑगस्टपासून गॅलेच्या मैदानावर तर दुसरी कसोटी 23 ऑगस्टपासून कोलंबोत खेळविली जाणार आहे. दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा 23 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
मध्य विभाग संघ: रजत पाटीदार (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), आर्यना ज्युएल, सारांश जैन, अमन मोखाडे, कुणाल चंडेला, झिशान अन्सारी, आर्यन पांडे, अर्शद खान, आयुष पांडे, यश राठोड, हर्ष दुबे, कुणालसिंग राठोड, यश ठाकुर व नचिकेत भुते.