सिटीज 2 योजनेतील प्रकल्पासाठी लवकरच केंद्रीय पथक बेळगावला
मनपाकडून सिटीज 2 प्रकल्प निश्चित : स्मार्ट सिटीकडे करणार अहवाल सादर
त. भा. प्रतिनिधी / बेळगाव
महानगरपालिकेकडून सिटीज 2 योजनेसाठी प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. विशेष करून सदर योजनेतून घन कचरा प्रक्रिया आणि व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्प राबविले जाणार आहेत. महानगरपालिकेने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन प्रकल्पांचा आराखडा तयार करून तो लवकरच स्मार्ट सिटीकडे पाठविला जाणार आहे.
महानगरपालिकेवर सिटीज 2 योजनेंतर्गत कोणकोणते प्रकल्प राबवावेत, त्यासाठी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत. आदी बाबी ठरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार मनपाचे साहाय्यक कार्यकारी पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी, समन्वय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. वेगवेगळ्या विभागांतील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रकल्प निश्चित करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
सिटीज 2 मधील प्रकल्प भविष्यात महानगरपालिकेकडेच हस्तांतरित केले जाणार आहेत. त्यामुळेच शहराची वाढती लोकसंख्या, कचरा व त्यासाठी आवश्यक प्रक्रिया क्षमता यांचा विचार करून प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. सदर प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महापालिकेकडून तालुक्यातील विविध गावांमध्ये सरकारी जागांचा शोध घेतला जात आहे. मात्र त्यासाठी ग्रामस्थांतून तीव्र विरोध केला जात आहे.
घनकचरा प्रक्रियेशी संबंधित प्रकल्प निश्चित
सिटीज 2 योजनेतील घनकचरा प्रक्रियेशी संबंधित प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीकडे आराखडा सादर केल्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया होणार असून लवकरच केंद्रीय पथक बेळगावला भेट देऊन प्रस्तावित प्रकल्पांची पाहणी करणार आहे.
-हणमंत कलादगी, साहाय्यक कार्यकारी पर्यावरण अभियंता, मनपा