शहर तपासणीसाठी येणार केंद्रीय पथक
सातारा :
सातारा शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी जशी सातारा पालिकेची तशीच सातारा शहरातील प्रत्येक नागरिकांची आहे. शहरातील कचऱ्यांचे व्यवस्थापन करताना पालिकेकडून नियोजन करण्यात येते. कुठेही सार्वजनिक ठिकाणी कचरा राहू नये, याची दक्षता सातारा पालिका घेत असते. त्यातच येत्या चार दिवसात केंद्राचे स्वच्छता पथक साताऱ्यात पाहणी करण्यासाठी येणार आहे. त्याच अनुषंगाने सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पथक शहरातील आकांक्षी टॉयलेटसहृ, स्वच्छ वॉर्ड याचबरोबर झोपडपट्ट्या यांचीही तपासणी करणार आहेत.
सातारा नगरपालिकेच्यावतीने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जात आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शहरातील प्रत्येक वॉर्डात दररोज सकाळी आणि संध्याकाळीही स्वच्छता राबवण्यात येत असते. त्याचबरोबर शहरातील घराघरात गोळा करण्यात येणारा कचरा हा उचलला जातो. त्याकरिता कचरागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यवसायिक कचराही उचलला जातो. त्याचेही पालिकेच्यावतीने नियोजन केले आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांचीही जबाबदारी आपले शहर स्वच्छ ठेवण्याची आहे. त्यादृष्टीने पालिकेकडून उपक्रम राबवण्यात येत असतात. तसेच शहरातील सार्वजनिक शौचालयांमध्येही काही आकांक्षी टॉयलेट उभारण्यात आली आहेत. त्या टॉयलेटमध्ये पाण्यापासून स्वच्छता करण्यापर्यंतची सुविधा पालिकेच्यावतीने अपडेट ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर काही शौचालये ही बांधून तयार आहेत. ती भाडे तत्वावर चालवण्यास देण्यात येणार आहेत. शहरातून उचलेला कचरा सोनगाव कचरा डेपोत नेल्यानंतर तेथे प्रक्रिया केली जाते. त्यामुळे केंद्राचे पथक चार दिवसांमध्ये कधीही सातारा शहराची पाहणी करण्यासाठी येणार असल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड, निरीक्षक सागर बडेकर, निरीक्षक प्रशांत गंजीवाले, राकेश गालियल यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी आरोग्य विभागातील मुकादम, सफाई कामगार यांनाही दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हे पथक शहरात आल्यानंतर कधीही कुठल्याही भागाला भेट देईल, पाहणी करेल, त्यामुळे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती कशी मिळेल यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न राहणार आहे.