For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईकरांचे हाल! मध्य रेल्वेचा बोजवारा! सिग्नल यंत्रणेत बिघाड, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा

03:57 PM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबईकरांचे हाल  मध्य रेल्वेचा बोजवारा  सिग्नल यंत्रणेत बिघाड  लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा
Advertisement
मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवेचा खोळंबा आणि तांत्रिक बिघाडांमुळे सोमवारी प्रवाशांचे मोठे हाल झाले. सकाळी सुमारे 10 वाजल्यापासून सिग्नल यंत्रणेत निर्माण झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दिशेवरील धीम्या व जलद मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी 2 वाजेपर्यंतही दुरुस्तीचे काम सुरू असल्याने लोकल गाड्यांसह लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही विलंबाचा सामना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने सुरुवातीला रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर कांजूरमार्ग येथील सिग्नल यंत्रणेच्या केबिनमध्ये आग लागल्याने ठाणे ते विक्रोळी दरम्यानची सिग्नल यंत्रणा ठप्प झाली. परिणामी, अनेक लोकल गाड्या जागच्या जागी थांबवाव्या लागल्या. रेल्वे रुळांवर गाड्यांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Advertisement

सकाळपासूनच प्रवासासाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना या बिघाडाचा फटका बसला. काही गाड्या बराच वेळ एकाच ठिकाणी उभ्या राहिल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून पायी पुढील स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला.

केबल बदलण्यासाठी आणखी वेळ लागणार

कांजूरमार्ग येथील सिग्नल केबिनला आग लागल्याने संबंधित केबल आणि सिग्नल यंत्रणेची तपासणी व दुरुस्ती करावी लागत आहे. खराब झालेल्या केबल बदलण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागू शकतात, अशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्यास रात्रीपर्यंत वेळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

Advertisement

सिग्नल यंत्रणा बंद पडल्यामुळे मोटरमनना लोकल गाड्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जागेवर थांबवाव्या लागल्या. अनेक स्थानकांवर आणि रेल्वे मार्गांवर गाड्यांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही सेवा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागू शकतो.

मेगाब्लॉकनंतर दुसऱ्याच दिवशी बिघाड

विशेष म्हणजे, रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेच्या देखभाल आणि नियोजनावर प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, लोकल गाड्यांना होणारा विलंब आणि अनिश्चित वेळापत्रक यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे.

सोमवारी संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळी प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती लवकर पूर्ण करून लोकल सेवा सुरळीत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाड नेमका कशामुळे झाला, दुरुस्ती कधी पूर्ण होणार आणि संपूर्ण वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.