मध्यवर्ती म.ए.समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
महामेळाव्याच्या परवानगीसंदर्भात चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. दि. 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या या महामेळाव्याला परवानगी द्यावी, असे पत्र यापूर्वीच पोलीस प्रशासनाला देण्यात आले असून याबाबत सर्व बाबींचा विचार करून लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
2010 पासून महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेत आली आहे. परंतु मागील काही वर्षांत कन्नड रक्षण वेदिकेच्या धमक्यांना घाबरून पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. परंतु हा मराठी भाषिकांचा हक्क असून म. ए. समितीने पोलीस प्रशासनाला काही नावे सुचविली आहेत, त्या ठिकाणी महामेळाव्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परवानगी देण्यासाठीचे पत्र दिले होते. कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन हे दोन आठवडे चालते. परंतु समितीचा महामेळावा हा केवळ एक दिवस असल्याने प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मध्यवर्तीच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अॅड. एम. जी. पाटील यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.