सीमाप्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधा
नगरसेवक रवी साळुंखे यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागातील 865 खेड्यांतील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार 1956 पासून अन्याय, अत्याचार करत आहे. त्यामुळे याकडे लक्ष घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीमावासियांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती द्यावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक रवी साळुंखे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
नागपूर येथे महाराष्ट्र सरकारचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्याठिकाणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीमावासियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत वाचा फोडली. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.