केंद्रीय कर्मचार्यांची दिवाळी गोड ! महागाई भत्त्यामध्ये मोठी वाढ, 1 कोटीहून अधिक कर्मचारी-पेन्शनधारकांना होणार लाभ
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयाचा लाभ सुमारे 48 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 68 लाख निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने विविध विकास योजनांसाठीही निधी मंजूर केला आहे.
पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार?
सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार महागाई भत्त्यातील ही वाढ मंजूर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ वेतनाच्या 60 टक्क्यांवरून 63 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे मूळ वेतनानुसार दरमहा मिळणाऱ्या महागाई भत्त्याच्या रकमेत वाढ होणार आहे.
सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 262 टक्क्यांवरून 269 टक्के करण्यात येणार आहे. तर पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार महागाई भत्ता 483 टक्क्यांवरून 497 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. ही वाढ 1 जुलै 2026 पासून लागू होणार असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.
कंटेनर निर्मिती क्षेत्रासाठी 10,000 कोटी
केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्याव्यतिरिक्त कंटेनर निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि या क्षेत्रातील उद्योगांना चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
क्रीडा साहित्य निर्मितीसाठी 1,856 कोटी
‘खेलो इंडिया स्पोर्ट्स गुड्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम’साठी 1,856 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही योजना आर्थिक वर्ष 2026-27 ते 2033-34 या आठ वर्षांच्या कालावधीत राबवली जाणार आहे.
या योजनेंतर्गत क्रीडा साहित्य निर्मिती क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देणे, उत्पादनासाठी विशेष क्षेत्रे विकसित करणे, मोठ्या गुंतवणुकीला पाठबळ देणे आणि विद्यमान उत्पादन केंद्रांना मदत करणे यांचा समावेश आहे. याशिवाय उत्पादनांची गुणवत्ता तपासणी, संशोधन, कौशल्य विकास, स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि भारतीय क्रीडा साहित्याचे ब्रँडिंग यावरही भर दिला जाणार आहे.
ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी 7,395 कोटी
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज योजना’ मंजूर केली आहे. या योजनेसाठी 7,395 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
2026-27 ते 2030-31 या पाच वर्षांच्या कालावधीत ही योजना राबवली जाणार आहे. ग्रामपंचायती अधिक सक्षम, स्वावलंबी, उत्तरदायी आणि कार्यक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विकसित भारताच्या संकल्पनेशी सुसंगत ग्रामीण प्रशासन व्यवस्था उभारण्यावर यात भर दिला जाणार आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होणार असून, संबंधित ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा यात समावेश असेल.
मंत्रिमंडळाच्या निर्णयांमुळे विविध क्षेत्रांना चालना
महागाई भत्त्यातील वाढीमुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी कंटेनर निर्मिती, क्रीडा साहित्य उत्पादन आणि ग्रामीण प्रशासन या क्षेत्रांसाठी मंजूर करण्यात आलेल्या योजनांमुळे संबंधित क्षेत्रांमध्ये विकासाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.