Kolhapur News: मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अस्वच्छतेच्या गर्तेत, धुळीचे साम्राज्य
कहर म्हणजे नागरिकांना धुळीच्या साम्राज्यातून इमारतीमध्ये प्रवेश करावा लागतो
By : अवधूत शिंदे
कोल्हापूर : शासनाच्या वतीने स्वच्छ भारत योजना राबवली जात आहे. मात्र मध्यवर्ती प्रशासकीय इमारतच स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी मावा, गुटखा खाऊन थुंकल्यामुळे डाग पडले आहेत. निरोपयोगी फर्निचर, अस्ताव्यस्त पडलेले बांधकामाचे साहित्य यावर कहर म्हणजे नागरिकांना धुळीच्या साम्राज्यातून इमारतीमध्ये प्रवेश करावा लागत आहे.
प्रशासनाचे मध्यवर्ती ठिकाणच अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहे. याचबरोबर शहरासह ग्रामीण भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये 15 हून अधिक शासकीय कार्यालये आहेत. या इमारतीमध्ये सहकार न्यायालय देखील आहे.
या ठिकाणी दररोज शेकडो नागरिकांची कामानिमित्त ये जा होत असते. ही शासकीय इमारत बाहेऊन चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते, पण इमारतीच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळते. या शासकीय इमारतीमध्ये प्रवेश केल्या केल्या सर्वत्र कचरा व धुळीचे साम्राज्य पाहायला मिळते. तसेच इमारतीमध्ये पाण्याची कमतरता असल्याचेही जाणवते. याचा कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो
इमारतीमधील कार्यालये
- दोन न्यायालये
- शहर पुरवठा कार्यालय
- राज्य गुप्तवार्ता विभाग
- मुद्रांक शुल्क विभाग
- जिल्हा माहिती कार्यालय
- अण्णासाहेब आर्थिक महाविकास मंडळ
- जलभूमापन
- उपसंचालक आरोग्य सेवा
- जिल्हा विशेष लेखा परीक्षक
- टीपी (कोल्हापूर शहर नागरी विकास प्राधिकरण)
शौचालयांची दुरवस्था
इमारतीमधील शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील शौचालयांची स्वच्छता नसल्याने इमारतीमध्ये प्रवेश केल्या केल्या दुर्गंधी पसरलेली असते. यामुळे कर्मचाऱ्यांना व येथे येणाऱ्या नागरिकांना नाक धरुनच आत प्रवेश करावा लागतो.
प्रशासकीय इमारतीमध्ये पाण्याची कमतरता
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक शासकीय कार्यालयांची ऑफीसेस आहेत. या ठिकाणी कर्मचारी तसेच येथे कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक येत असतात. पण येथे येणाऱ्या नागरिकांच्या संख्येनुसार येथे पाण्याची व्यवस्था पाहिजे तेवढी दिसत नाही. येथील कर्मचाऱ्यांना देखील पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यामुळे याचा नाहक त्रास होत आहे.
मध्यवर्तीय प्रशासकीय इमारतीमध्ये धुळीचे साम्राज्य
एकाच इमारतीमध्ये अनेक शासकीय कार्यालये असून पण येथील कार्यालयाच्या बाहेरील जागेमध्ये सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. इमारतीमध्ये प्रवेश केल्या केल्या दुर्गंधी पसरलेली असते. तसेच वरच्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयांमध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागतो.
येथील पायऱ्यांच्या कोपऱ्या कोपऱ्यांवर गुटखा, पान खाऊन थुंकल्याचे चित्र पाहायला मिळते. या सर्व कारणांमुळे इतर कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना व कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.