उबेर, ओला कंपन्यांना केंद्राची नोटीस
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या ग्राहक हितरक्षण विभागाने उबेर आणि ओला या कंपन्यांना नोटीस धाडली आहे. या कंपन्यांच्या वाहनसेवा दरांमध्ये भोबाईलच्या प्रकारांच्या आधारे अंतर दिसून आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. मोबाईल फोन जुना असेल तर त्याच प्रवासासाठी कमी बिल येते. मोबाईल स्मार्ट असेल तर हे बिल जास्त येते, अशा तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली. या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना टॅक्सीसेवा पुरविली जाते. मोबाईलवरुन या सेवेसाठी बुकिंग केले जाऊ शकते. ग्राहकाने सेवा आयफोनवर बुक केली असेल तर त्याला येणारे बिल आणि त्याच अंतरासाठी सेवा अँड्रॉईड सुविधा असलेल्या मोबाईलवरुन बुक केली तर येणार बिल यांच्यात फरक असतो. तसेच जे ग्राहक सातत्याने प्रवासाच्या दराची पडताळणी करतात आणि जे ग्राहक नेहमी प्रवाससेवा बुक करतात, त्यांना समान अंतरासाठी अधिक बिल येते, अशीही तक्रार अनेक ग्राहकांनी केली आहे.
अॅपसंबंधी तक्रारी
या कंपन्यांची सेवा घेण्यासाठी विशिष्ट अॅपचा उपयोग करावा लागतो. दोन भिन्न अॅप्सचा उपयोग केला असता त्यांच्यामाध्यमातून येणाऱ्या बिलामध्येही तफावत आढळून येते अशी तक्रार दिल्लीतील एका उद्योजकाने केली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तक्रारीत तथ्य आढळून आल्याने कंपन्यांना नोटीसा पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली.
आरोपांचा इन्कार
समान अंतरासाठी कोणत्याही मोबाईल अॅपवरुन सेवा बुक केली तर समान बिल येते, असे स्पष्ट करत उबेर कंपनीने आरोपांचा इन्कार केला. ग्राहकांचे पिक अप पॉईंटस् वेगळे असतील तर बिलांमध्ये असा फरक येऊ शकेल, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न या कंपनीने केला आहे. मात्र तो सरकारला किंवा ग्राहकांना पटलेला नाही. त्यामुळे चौकशी केली जाणार हे उघड आहे.