'वन नेशन...वन इलेक्शन'ला केंद्राकडून मंजुरी! संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक येण्याची शक्यता
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एकाचवेळी निवडणुका घेण्याचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे, या संदर्भातील माहिती सूत्रांनी दिली.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवल्यानंतर तो स्विकारण्यात आला.
मागील काही दिवसांपासून, सत्ताधारी भाजपने 'वन नेशन...वन इलेक्शन'साठी मोठी पावले टाकली आहेत. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात भाष्य केले होते.
देशात होणाऱ्या निवडणूका एकाचवेळी घेणे ही "काळाची गरज" असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीला अडथळे निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
या आठवड्याच्या सुरुवातीला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सध्याच्या कार्यकाळात 'वन नेशन...वन इलेक्शन' नक्कीच लागू करण्यात येईल असे म्हटलं आहे.