महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस अधिवेशनाचा आजपासून शतकमहोत्सव

06:58 AM Dec 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेसचे वरिष्ठ नेते बेळगावात दाखल : दोन दिवस कार्यक्रमांची रेलचेल : संपूर्ण शहर-उपनगर परिसर विद्युत रोषणाईने उजळला

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

अधिवेशनात भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री विशेष विमानाने बेळगावात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे गेल्या चार दिवसापासून बेळगावात तळ ठोकून आहेत. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, कायदा मंत्री एच. के. पाटील, मंत्री जमीर अहमद यांच्यासह अनेक नेते बुधवारी बेळगावात आले आहेत. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे शतक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सरकारने मोठी यंत्रणा राबविली आहे.काँग्रेस विहीर परिसर, सीपीएड मैदान, ऑटोनगर परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बेळगाव येथील काँग्रेस अधिवेशनाचे शतक महोत्सव साजरा होत असतानाच कर्नाटकाचे मल्लिकार्जुन खर्गे हे एआयसीसी अध्यक्षपदावर आहेत. हा योगायोग साधून अधिवेशन यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे.

वीरसौध परिसरात महात्मा गांधीजींनी ज्याठिकाणी बसून भाषण केले. त्याठिकाणी गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. सर्व फोटोंचे डिजिटलायजेशन करण्यात आले आहे. वीरसौध परिसरातच अखिल भारतीय काँग्रेस समितीची कार्यकारिणीही होणार असून या अधिवेशनात राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय नेते भाग घेणार आहेत. शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी सुवर्णसौध परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

काँग्रेस अधिवेशनानिमित्त शाळांना सुटी

बेळगाव : महात्मा गांधीजींच्या उपस्थितीत झालेल्या अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त दि. 26 व 27 रोजी बेळगावमध्ये भव्य काँग्रेस अधिवेशन होत आहे. यासाठी बेळगाव शहर व तालुक्यातील सर्व सरकारी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक व अंगणवाड्यांना गुरुवार दि. 26 व शुक्रवार दि. 27 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुटीचे आदेश बजावले आहेत.

महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये बेळगावमध्ये अधिवेशन झाले होते. या सोहळ्याला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्य सरकारच्यावतीने काँग्रेस अधिवेशन भरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाला देशातील काँग्रेसचे खासदार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, कर्नाटकातील मंत्रीमंडळ तसेच सहयोगी, राजकीय पक्षांचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. यासाठी 26 व 27 रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामुळे शाळांना नाताळ, अधिवेशनाचे असे सलग तीन दिवस सुटी मिळाली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगावात

: महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकोत्सव कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या विशेष विमानाने बेळगावात दाखल झाले आहेत. सायंकाळी 4.15 वाजता विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. त्यानंतर सुवर्णसौधला भेट देऊन अधिवेशन तयारीची त्यांनी पाहणी केली.

सुवर्णसौधमधील बँक्वेट हॉल येथे मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर जाहीर सभेच्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी केली. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या अतिथीगृहात तीन दिवस मुख्यमंत्र्यांचे वास्तव्य असणार आहे. गुरुवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी 10.10 वाजता टिळकवाडी येथील वीरसौधला भेट देऊन फोटो गॅलरीचे उद्घाटन, महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण व विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात भाग घेणार आहे.  त्यानंतर 10.45 वाजता सरदार मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वस्तूप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

सकाळी 11.15 वाजता रामतीर्थनगर येथे गंगाधरराव देशपांडे स्मारक भवन व फोटो गॅलरीचे उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री भाग घेणार आहेत. दुपारी 3 वाजता वीरसौध येथे होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ते भाग घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे तीन दिवसांचे कार्यक्रम जाहीर झाले असून शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी विशेष विमानाने ते बेंगळूरला रवाना होणार आहेत.

काँग्रेस अधिवेशनाच्या शतकोत्सव कार्यक्रमावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना महात्मा गांधीजी कळाले नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना वर्षभर महात्मा गांधीजींच्या विचारांचे प्रचार करणारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. सी. टी. रवी प्रकरणावर बोलताना आपली चूक झाकून घेण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले आहे. चौकशीत सत्य बाहेर पडेल, असे सांगतानाच खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social_media
Next Article