For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरमळेतील शतायुषी सावित्री डोईफोडे यांचे निधन

05:00 PM Feb 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सरमळेतील शतायुषी सावित्री डोईफोडे यांचे निधन
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

कष्टकरी जीवनाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या सरमळे येथील शतायुषी सावित्री भैरू डोईफोडे (१०५) यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या या आजी
चार पिढ्यांचा चालता बोलता इतिहास म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत डोईफोडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.कष्टकरी आणि संघर्षाच्या प्रवासात मेंढपाळ संस्कृतीचा वारसा जपत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अत्यंत कष्टाने व्यतीत केले. बदलता काळ आणि अनेक पिढ्या त्यांनी जवळून पाहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांवर संस्कार करताना भरे व कोळसे विकून मेंढपाळ व्यवसायातून कुटुंबाचा
विस्तार केला. ​त्या केवळ वयानेच मोठ्या नव्हत्या तर अनुभवाच्या व प्रेमळ स्वभावाच्या श्रीमंतीनेही समृद्ध होत्या. समाजातील चालीरीती, पारंपरिक ओव्या आणि लोककथांचा त्यांच्याकडे मोठा संग्रह होता. प्रेमळ आणि मार्गदर्शक स्वभावामुळे त्या गावात 'आजी' म्हणून परिचित होत्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या दृष्टीसह स्मरणशक्ती आणि उत्साह तरुणांना लाजवणारा असाच होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सरमळे गावातून बांदा बाजारपेठेचा पायीच प्रवास केला. त्यांच्या नाकातील पंचधातूंची १० टोळ्यांची भारदस्त मोती आबालावृद्धांचे लक्ष वेधत होती. शेवटपर्यंत सर्व दात जैसे थे असलेल्या या आजीनी कुठल्याही आजारासाठी आतापर्यंत साधी कुठलीही गोळी घेतली नाही. बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील विठ्ठल डोईफोडे, धुळू डोईफोडे, तसेच बांदा - दानोली जिल्हा मार्गावरील सरमळे आमराई येथील समाधान नाष्टा सेंटरचे मालक मनोहर डोईफोडे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे जावई असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.