जनगणनेचा प्रारंभ मार्च 2027 पासून
दोन टप्प्यांमध्ये कार्य पूर्ण करण्याची केंद्राची योजना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशाच्या जनगणनेचा प्रारंभ 1 मार्च 2027 पासून होण्याची शक्यता आहे. हे कार्य दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळच्या जनगणनेचे प्रमुख वेशिष्ट्या असे, की जातीच्या आधारावरील जनगणनेचाही यात समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जात्याधारित जनगणनेला मान्यता दिल्याने लोकांना त्यांची जातही नोंद करावी लागणार आहे. यावेळची जनगणना पूर्णत: डिजिटल पद्धतीने होणार आहे. ती 3 वर्षांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या जनगणनांचे काम 5 वर्षांमध्ये पूर्ण होत असे. यावेळच्या जनगणनेत कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचीही नोंद केली जाणार आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीचेही अनुमान काढता येणार आहे.
दोन टप्प्यांची प्रक्रिया
जनगणना प्रक्रियेचे दोन टप्पे निर्धारित करण्यात आले आहेत. प्रथम टप्प्यात केवळ लोकांची गणना केली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीचे नाव, वय, लिंग, शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, निवासस्थान आदी माहिती या प्रथम टप्प्यात संकलित केली जाणार आहे. तर द्वितीय टप्प्यामध्ये जातिनिहाय जनगणना होणार आहे. जातिनिहाय जनगणनेची घोषणा अद्याप केंद्र सरकारने प्रकटरित्या केलेली नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी अशा जनगणनेसाठी सज्जतेला प्रारंभ केला आहे.
1931 नंतर प्रथमच
भारतात यापूर्वीची जातीनिहाय जनगणना 1931 मध्ये ब्रिटीश राजवटीत झाली होती. त्यानंतर मात्र, कधीही जात हा मुद्दा जनगणनेत नव्हता. केवळ वर्गनिहाय जनगणना केली जात होती. आता त्यानंतर 96 वर्षांनी जातीनिहाय जनगणना होणार आहे. यामुळे प्रत्येक जात आणि पोटजात यांची लोकसंख्या किती, याचीही नेमकी माहिती मिळणार आहे. तसेच, लोकांच्या आर्थिक परिस्थितीचीही नेमकी माहिती समाज आणि सरकार या दोघांनाही मिळणार आहे.
प्रथम हिमाच्छादित प्रदेशांमध्ये
जनगणनेचे कार्य प्रथम हिमाच्छादित प्रदेशांमध्ये, अर्थात, जम्मू-काश्मीर लडाख तसेच उत्तराखंड आदी प्रदेशांमध्ये हाती घेतले जाणार आहे. अशा प्रदेशांमध्ये 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणना केली जाईल. मार्चमध्ये या भागांमध्ये संचार करणे अवघड असल्याने तेथे आधी हे काम करण्यात येणार आहे.