फुटबॉल स्टेडियमखाली मिळाली दफनभूमी
खोदकामात समोर आले सत्य
व्हिएन्नामध्ये एका फुटबॉल स्टेडियमच्या नुतनीकरणादरम्यान कामगारांना रोमन साम्राज्याच्या काळातील एक सामूहिक दफनभूमी मिळाली. यात कमीतकमी 129 सांगाडे आढळून आले आहेत. हे सांगाडे सुमारे 2 हजार वर्षापूर्वी जर्मनिक समुदायांसोबत झालेल्या युद्धात मारले गेलेल्या योद्ध्यांचे असू शकतात, असे तज्ञांचे मानणे आहे. सिमरिंग जिल्ह्यात एका क्रीडामैदानाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना हा शोध लागला आहे. निर्मिती कंपनीला मोठ्या संख्येत मानवी अवशेष दिसून आल्यावर व्हिएन्ना संग्रहालयाच्या पुरातत्व विभागाला कळविण्यात आले. यानंतर सुरू झालेले उत्खनन आणि विश्लेषणातून ही दफनभूमी पहिल्या शतकातील असल्याचे कळले. व्हिएन्नाच्या विंडोबोना येथे रोमन साम्राज्याचा एक प्रमुख सैन्य किल्ला या ठिकाणी होता असेही समोर आले. रोमन युद्धाच्या घटनांच्या संदर्भात योद्ध्यांचा शोध महत्त्वाचा आहे. जर्मनीत विशाल युद्धक्षेत्र असून तेथे शस्त्रास्त्रs आढळून आली होती, परंतु मृतांचे अवशेष आढळणे पूर्ण रोमन इतिहासासाठी अनोखी बाब असल्याचे उद्गार पुरातत्व उत्खननाचे नेतृत्व करणाऱ्या मायकेला बाइंडर यांनी काढले आहेत.
सामूहिक दफनभूमीचे महत्त्व
व्हिएन्ना नगर पुरातत्व विभागाच्या प्रमुख क्रिस्टीना एडलर-वॉल्फल यांनी या शोधाला जीवनात एकदाच मिळणारी संधी ठरविले. रोमन साम्राज्याच्या युरोपीय हिस्स्यांमध्ये त्याकाळात अग्निसंस्कार सामान्य बाब होती, याचमुळे अशाप्रकारची दफनभूमी सापडणे अत्यंत दुर्लभ आहे. दफनभूमीत मिळालेल्या सांगाड्यांवर युद्धादरम्यान झालेल्या जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. यातून हे लोक मोठ्या युद्धात मारले गेले होते याचे संकेत मिळतात. सर्व पीडित पुरुष होते, बहुतांश जणांचे वय 20-30 वर्षांदरम्यान होते आणि त्यांचे दात सामान्य स्वरुपात उत्तम स्थितीत होते, असे वॉल्फल यांनी सांगितले.
अनेक महत्त्वाचे पुरावे
पुरातत्व तज्ञांनी दफनभूमी महत्त्वपूर्ण वस्तूही हस्तगत केल्या आहेत. ज्यात खंजीर, कवचाचे तुकडे आणि रोमन सैन्य बुटांचे खिळे सामील आहेत. एका सांगाड्याच्या हाडात अडकलेला लोखंडी भालाही मिळाला असून तो त्या काळातील युद्धाची क्रूरता दर्शवितो. ही सामूहिक दफनभूमी वर्तमान व्हिएन्ना क्षेत्रात झालेल्या पहिल्या ज्ञात लढाईचा भौतिक पुरावा असू शकतो. कार्बन-14 विश्लेषणाद्वारे हाडांचे वयोमान ईसवी सन 80-130 दरम्यान निर्धारित करण्यास मदत मिळाल्याचे पुरातत्व तज्ञांनी सांगितले.
तपासणी जारी
आतापर्यंत केवळ एका मृतदेहाची रोमन सैनिक म्हणून पुष्टी झाली आहे. पुरातत्व तज्ञांनी डीएनए आणि स्ट्रॉन्टियम आयसोटोप विश्लेषणाद्वारे उर्वरित योद्धे कुठल्या बाजूचे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. व्हिएन्ना संग्रहालयाच्या तज्ञांनी या शोधाबद्दल पहिल्यांदाच माहिती जारी केली असून याला सैन्य संदर्भात एका विनाशकारी घटनेशी जोडण्यात आले आहे.