सिमेंट उद्योग 6.5 ते 7 टक्के विकसित राहणार : इक्राचा अंदाज
आर्थिक वर्ष 2027 साठी अंदाज : उत्पादन क्षमता वाढणार
नवी दिल्ली :
बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रात लागणाऱ्या सिमेंटच्या मागणीत वाढ कायम राहणार असून भारतातला सिमेंट उद्योग आर्थिक वर्ष 2027 मध्ये 6.5 ते 7 टक्के इतका वाढीव राहणार असल्याचे इक्रा या रेटींग एजन्सीने म्हटले आहे. गृह बांधणीसाठी त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांसाठी सिमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ही मागणी स्थिर राहणार असून या आधारावरच वरील एक अंकी विकास साध्य केला जाणार असल्याचा अंदाज इक्रा या संस्थेने वर्तविला आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये सिमेंट उद्योगाचा विकास 6.5 ते 7.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये सिमेंट उत्पादन क्षमता 85 ते 90 दशलक्ष टन वार्षिक वाढू शकते. सिमेंटची मागणी आर्थिक वर्ष 2026 मध्ये जवळपास 8.5 टक्के इतकी वाढीव राहीली असून बांधकाम क्षेत्रातल्या प्रकल्पांमुळे मागणी वाढीव राहिली आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या दुसऱ्या सहामाहित मागणी अधिक सुधारण्याची शक्यता इक्राने वर्तविली आहे.
मागणी का वाढणार
जीएसटी ध्येय धोरणातील बदलाचा परिणाम सिमेंटच्या मागणीत वाढ दर्शविणारा ठरला. सरकारला आपल्या पायाभूत सुविधांसाठी सिमेंटचा वापर करणे त्यावरील जीएसटी 28 वरून 18 टक्के इतका कमी केल्याने फायदेशीर ठरले आहे.