प्लास्टिक कचऱ्यासाठी सिमेंट कंपन्यांकडून आकारणार शुल्क
मनपाकडून हालचाली सुरू : ऑनलाईन माध्यमातून शुल्काची होणार आकारणी
बेळगाव : शहरातील कचरास्वरुपी प्लास्टिक सध्या कोणतेही शुल्क न आकारता जेके आणि दालमिया या दोन सिमेंट कंपन्यांना पुरविले जाते. मात्र, या प्लास्टिकच्या माध्यमातून उत्पन्न मिळावे, यासाठी महापालिकेच्यावतीने विचार चालविण्यात आला आहे. सिमेंट कंपन्यांकडून प्लास्टिकच्या स्वरुपात शुल्क आकारण्याच्या हालचाली मनपाने चालविल्या आहेत. तसे झाल्यास महापालिकेला या माध्यमातून उत्पन्न मिळणार आहे. बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा तयार होतो. प्लास्टिकवर बंदी असतानाही त्याची विक्री आणि वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी शहरात 250 टन कचरा तयार होत होता. मात्र, आता वर्गीकरण केले जात असल्याने कचऱ्याच्या निर्मितीत घट झाली असून 190 ते 200 टनापर्यंत कचरा तयार होत आहे. विशेषकरून सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण अधिक असते. यापूर्वी महापालिकेकडून प्लास्टिक लँड फिल केले जात होते.
मात्र, गेल्या चार वर्षांपासून महापालिकेकडून हे प्लास्टिक सिमेंट कंपन्यांना दिले जात आहे. सिमेंट कंपन्यांमध्ये प्लास्टिक व तत्सम कचरा इंधन म्हणून वापरला जातो. प्लास्टिक नेण्याबाबत महापालिका, जेके व दालमिया सिमेंटमध्ये करार झाला आहे. सध्या या मोबदल्यात महापालिकेला कोणतेही आर्थिक उत्पन्न मिळत नाही. प्लास्टिक बेळगावातून येण्यासाठी जो खर्च येतो, तो सिमेंट कंपन्यांकडूनच केला जातो. त्यामुळे महापालिकेला कोणताही आर्थिक फटका बसत नाही. शहरातून उचल केलेला प्लास्टिक कचरा तुरमुरी कचरा प्रकल्पात साठवला जातो. तेथून सिमेंट कंपन्यांकडून या प्लास्टिकची उचल केली जाते. सध्या कोणतेही शुल्क न आकारता सिमेंट कंपन्यांना प्लास्टिक पुरविले जात आहे. पण या माध्यमातून मनपाला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नसल्याने संबंधित कंपन्यांकडून शुल्क आकारण्याच्या हालचाली महापालिकेने चालविल्या आहेत. हे शुल्क ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले जाणार असून यासाठी आवश्यक तयारी केली जात आहे. तसे झाल्यास प्लास्टिक कचऱ्याच्या माध्यमातून महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. शहरात दररोज 20 टन प्लास्टिक कचरा सापडतो. त्यामुळे प्लास्टिकसह ओला आणि सुका कचऱ्याच्या उचलीसाठी दरवर्षी महापालिकेकडून 30 कोटी रुपये खर्च केले जातात.