सिमेंट कंपन्यांची चांगली कमाईची शक्यता
मार्च तिमाहीचा अंदाज : किमतीत झाली वाढ
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : आर्थिक वर्ष 2026 मध्ये मार्चच्या तिमाहीमध्ये आघाडीवरच्या सिमेंट कंपन्यांच्या कमाईमध्ये चांगली वाढ होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. बांधकाम क्षेत्रातल्या वाढत्या हालचाली त्याचबरोबर सरकारकडून पायाभूत सुविधांवर होणारा खर्च लक्षात घेता सिमेंट कंपन्या मार्च तिमाहीमध्ये चांगली कमाई करू शकतात.
इंधनाच्या वाढत्या किमती आणि पॅकेजिंगकरिता येणारा खर्च वाढल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर याचा परिणाम जाणवू शकतो. सदरच्या तिमाहीमध्ये सिमेंटची विक्री 9 टक्के वाढीसोबत 126 दशलक्ष टन इतकी राहू शकते. देशांतर्गत सिमेंटची मागणी बऱ्यापैकी राहिलेली असली तरी नफ्यातील मार्जिनवरती मात्र दबाव पहायला मिळतो आहे. पश्चिम आशियातील अमेरिका, इराण यांच्यातील बिघडलेल्या तणावामुळे सिमेंट कंपन्यांवरती दबाव दिसतो आहे.
किमती वाढल्या
याच दरम्यान पश्चिम आशियातील संकटाच्या छायेत सिमेंटच्या किमती मात्र वाढलेल्या दिसून आल्या. जानेवारी महिन्यात एका सिमेंट पोत्याची किमत 7 ते 10 रुपये, फेब्रुवारी महिन्यात 2 ते 3 रुपये आणि मार्च महिन्यामध्ये 4 ते 5 रुपये प्रति बॅग वाढलेल्या दिसून आल्या. आर्थिक वर्ष 2026 च्या चौथ्या तिमाहीत वर्षाच्या आधारावर सिमेंटच्या किमती 1 ते 3 टक्के वाढलेल्या पहायला मिळाल्या.