१५ वर्षांनी पुनरागमन करणार सेलिना
सेलिना जेटली 15 वर्षांच्या दीर्घ ब्रेकनंतर अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. अलिकडेच स्वत:च्या खासगी आयुष्यातील समस्यांमुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वत:च्या कमबॅक प्रोजेक्टची घोषणा केली आहे. सेलिना राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्ममेकर राम कमल मुखर्जी यांच्या आगामी चित्रपटात सिस्टर निवेदिता यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. सेलिना सध्या घटस्फोट आणि मुलांच्या ताब्याच्या प्रकरणात गुंतून पडली आहे. ती स्वत:चा भाऊ निवृत्त मेजर विक्रांत कुमार जेटलीला भारतात परत आणण्यासाठी देखील संघर्ष करत आहे. तो सध्या युएईतील तुरुंगात कैद आहे.
सेलिनाने इन्स्टाग्रामवर स्वत:च्या नव्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अरित्र दास आणि सर्बानी मुखर्जी करत आहेत. राम कमल मुखर्जी यांच्या दमदार चित्रपटासोबत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. इतिहासातील सर्वात असाधारण महिलांपैकी एक सिस्टर निवेदिता यांची व्यक्तिरेखा साकारत असल्याचे सेलिनाने म्हटले आहे. माझ्या आयुष्याचा प्रवास सिस्टर निवेदिता यांच्याशी मिळताजुळता आहे. सिस्टर निवेदिता यांच्याप्रमाणे मी देखील युरोपमध्ये अनेक वर्षे वास्तव्य केल्यावर भारतात परतली आहे, आरामाच्या शोधात नव्हे तर स्वत:च्या जीवनाला पुन्हा सावरणे अन् स्वत:च्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी सेलिनाने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
