सेलिना जेटली घेणार घटस्फोट
अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटलीच्या आयुष्यात सध्या वादळ उठले आहे. एकीकडे तिचा मोठा भाऊ निवृत्त मेजर विक्रांत कुमार जेटली सुमारे एक वर्षापेक्षा अधिक काळापासून युएईच्या तुरुंगात कैद असून त्याच्या मुक्ततेसाठी ती प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे तिच्या वैवाहिक आयुष्यातही वादळ आले आहे. सेलिनाने पती पीटर हाग विरोधात मुंबईतील एका न्यायालयात घरगुती हिंसेची तक्रार नोंदविली आहे. सेलिनाचा पती पीटर हाग एक ऑस्ट्रियन हॉटेलियर असून मोठा उद्योजक म्हणून ओळखला जातो. त्याचा उद्योग दुबई आणि सिंगापूरच्या प्रमुख हॉस्पिटॅलिटी ग्रूप्सपर्यंत फैलावलेला आहे. सेलिना आणि पीटर यांची भेट 2010 मध्ये दुबईतील एका इव्हेंटमध्ये झाली होती.
त्यानंतर दोघेही प्रेमात पडले होते आणि 2011 साली विवाहबंधनात अडकले होते. 2012 साली सेलिनाने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यानंतर 2017 साली तिने पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यातील एका मुलाचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला होता. सेलिना आता घटस्फोटासह पीटर हागकडून 50 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी करत आहे. तसेच 10 लाख रुपयांच्या मासिक निर्वाह भत्त्याची तिने मागणी केली आहे. सेलिना सध्या भारतात एकटीच आली असून तिची मुले सध्या पित्यासोबत ऑस्ट्रियात असल्याचे समजते. सेलिना जेटली स्वत:च्या मुलांचा ताबा मिळावा अशीही मागणी करत आहे. सेलिनाला सध्या दरदिनी स्वत:च्या मुलांसोबत केवळ एक तास टेलिफोन वरुन बोलण्याची अनुमती मिळाली आहे.