मर्कंटाईलच्या स्वरसंध्या कार्यक्रमात दिग्गज भाग घेणार
बेळगाव : गेली सोळा वर्षे सातत्याने महाराष्ट्रातील अनेक गायकांना व कलाकारांना बेळगावात आणून त्यांच्या कलेला वाव देण्याबरोबरच बेळगावकरांची संगीताची भूक भागविणाऱ्या मर्कंटाईल को-ऑप. व्रेडिट सोसायटीच्यावतीने यंदा ज्ञानेश्वरी घाडगे आणि अनुष्का शिकतोडे या उदयोन्मुख कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. येत्या 21 व 22 जानेवारी रोजी रामनाथ मंगल कार्यालयात सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन संजय मोरे यांनी या दोन्ही गायकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. ज्ञानेश्वरी घाडगे ही ठाण्यातील एका सामान्य कुटुंबातील रिक्षाचालकाची मुलगी असून तिने आपल्या सुमधूर आवाजातील भजने आणि गवळणीद्वारा महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. हिंदी झी चॅनेलवरील सारेगम लिटल चॅम्पमध्ये यश संपादन केले आहे. ती केवळ आठव्या इयत्तेत शिकत आहे. अनुष्का शिकतोडे ही महाराष्ट्रातील हास्यजत्रा फेम असून तिचा जादुई आवाज घराघरात पोहोचला आहे. मूळ सोलापूरची असलेल्या अनुष्काने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले असून ती संगीत विशारदही आहे. अनेक स्टेज शो तिने केले असून साथीया व मन के परिंदे हे तिचे अल्बम प्रसिद्ध आहेत. ‘सुर नवा ध्यास नवा’मध्ये ती फायनलिस्ट आहे. अशा या मातब्बर गायिकांना ऐकण्याची संधी बेळगावकरांना मर्कंटाईल सोसायटीने उपलब्ध करून दिली आहे.