Chandra Grahan 2026 | खग्रास चंद्र ग्रहणाची पर्वणी ; भारतात खग्रास, महाराष्ट्रात खंडग्रास दर्शन
कोल्हापुरात ७ मिनिटांचा खग्रास चंद्रग्रहणाचा अनुभव
कोल्हापूर -चंद्रग्रहण हा एक सावल्यांचा खेळ आहे. 'चंद्रग्रहण ही एक रोमांचक खगोलीय घटना आहे. मंगळवार, दि. ३ रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार असून, या माध्यमातून ब्लडमून पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती विवेकानंद कॉलेजमधील फिजिक्स पदव्युत्तर विभागाचे अडजंक्ट प्रोफेसर डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली. कोल्हापुरात केवळ सातच मिनिटे हे चंद्रग्रहण अनुभवायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. करंजकर म्हणाले, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. मंगळवारी होणारे चंद्रग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण असून ते भारतातून ग्रस्तोदित स्वरूपात दिसणार आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा भारतात चंद्र उगवेल, तेव्हा त्याला आधीच ग्रहण लागलेले असेल. हे चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑ स्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराच्या काही भागांतून दिसणार आहे. भारताच्या बहुतांश भागांतून हे ग्रहण दिसणार आहे. मात्र, ते पूर्णवळ दिसणार नाही. भारताच्या पूर्व आणि ईशान्य राज्यांमध्ये (उदा. आसाम, पश्चिम बंगाल) हे अधिक चांगल्या प्रकारे आणि जास्त काळ दिसेल, कारण तिथे चंद्रोदय लवकर होतो.
ब्लड मून म्हणजे काय?
कोल्हापूरमध्ये चंद्रोदय हा दि. ३ रोजी ६ वाजून ४० मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे फक्त ७ मिनिटेच ग्रहण पाहता येणार आहे. या ग्रहणादरम्यान, चंद्र तांबूस दिसतो. याचे कारण असे की पृथ्वीचे बाताबरण सूर्याच्या प्रकाशातील निळा रंग विखुरते आणि केवळ लाल रंगाचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू लागतो. यालाच 'ब्लड मून" असे म्हणतात.
सूर्यग्रहणासारखे चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही विशेष फिल्टरची गरज नसते. ते उघड्या डोळ्यांनी पाहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. खगोलशास्त्रानुसार चंद्रग्रहण ही केवळ एक सावल्यांचा खेळ आहे. यामुळे जेवणावर किंवा इतर कामांबर कोणतेही वैज्ञानिक दुष्परिणाम होत नाहीत.
त्यामुळे भीती न बाळगता या विलोभनीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहनही प्रा. डॉ. कारंजकर यांनी केले. छायाकल्प ग्रहणाची सुरुवात दुपारी २ वाजून १४ मिनिटांनी होणार आहे. म्हणजे चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत असतो. ग्रहणाचा स्पर्श काळ दुपारी ३ वाजून २० मिनिटाला होणार असून, मध्यकाळ सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटांनी आहे तर मोक्ष ६ वाजून ४८ मिनिटांनी होणार आहे.