महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देव दिवाळीचा उत्सव

06:30 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव भारतीय उपखंडात विविध कालखंडात संपन्न होता. आषाढातल्या अमावस्येला दिव्यांची आरास करणे पुण्यप्रद मानलेले आहे. आश्विनातल्या अमावस्येला जेव्हा चतुर्दशी एक दिवस अगोदर साजरी केली जाते, तेव्हा गोवा-कोकणात नरकासुराचे दहन केल्यानंतर दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्षातल्या पौर्णिमेला काही मंदिरांसमोर जी दीपमाळ उभी असते, ती दिव्यांनी सजवून, देवदिवाळी साजरी केली जाते. परंतु असे असले तरी कार्तिकातल्या पौर्णिमेला देव दिवाळीचा उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो, त्यामागे त्रिपुरासुर नावाच्या दैत्याच्या त्रासाने संत्रस्त झालेल्या जनतेला भगवान शिवाने त्याचा वध करून मुक्तता केल्याप्रीत्यर्थ मानले जाते.

Advertisement

भारतीय लोकमानसाने आपल्या समस्त कलांनी विकसित झालेल्या पौर्णिमेच्या चंद्राला धर्म-संस्कृतीत महत्त्वाचे स्थान दिलेले असून, त्यामुळे वर्षातल्या बाराही पौर्णिमेला सण-उत्सवांची वैविध्यपूर्ण आणि समृद्ध परंपरा निर्माण केलेली पाहायला मिळते. कार्तिक हा शरद ऋतुत दुसऱ्या टप्प्यात येणारा महिना खरेतर सण-उत्सवांनी युक्त असला तरी कार्तिक पौर्णिमेला भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतो. या पौर्णिमेच्या रात्री त्रिपुरासुराचा वध करून देवमानवांना मुक्त केल्याने, ही शुभदायी रात्र दिव्यांची सुरेख आरास करून साजरी झाल्याने, तिला ‘देव दिवाळी’ अशी संज्ञा प्राप्त झाली.

Advertisement

चांद्र कालगणनेनुसार या महिन्यात चंद्र कृत्तिका नक्षत्राजवळ असतो आणि त्यामुळे या मासाला कार्तिक असे नाव लाभलेले आहे. सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो. स्कंद, सुब्रह्मण्य, षण्मुख, मुरुगन, सरवण, देवसेनापती, स्वामीनाथ, वलायुदा आदी नावांनी परिचित असलेल्या कार्तिकेयाचा संबंध कार्तिक महिन्याशी जोडलेला आहे. शिवाच्या कृपेने जन्माला आलेल्या सहा बालकांच्या संयुक्त रुपाचे संगोपन कृत्तिकाने केले म्हणूनही त्याला कार्तिकेय असे नाव प्राप्त झाल्याचे मानले जाते आणि त्याचा जन्म या महिन्यात झाल्याची श्रद्धा रुढ झाल्याने, कार्तिक मासाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभल्याचे मानले जाते. प्राचीन इंडो-सिथियन नाण्यांवरती त्याचे नाव ग्रीक लिपीत स्कंद, कुमार असे कोरलेले आढळल्याने या देवतेचे ऐतिहासिक काळातले महत्त्व अधोरेखित झालेले आहे. वृषभ राशीतील कृत्तिका हा साध्या डोळ्यांनी दृष्टीस पडणारा तारकापुंज असून, सात तारकांचा पुंजका साध्या डोळ्यांनी दिसत असला तरी दूरदर्शीतून पाहिल्यास त्यात असंख्य तारका दिसतात. या तारकापुंजात उष्ण आणि निळ्या रंगाच्या ताऱ्यांची संख्या लक्षणीय असते. भारतीय संकल्पनेत या सात तारकांना सप्तर्षीच्या पत्नी मानलेल्या आहेत. अंबा, दुला, नितत्नी, अभ्रयंती, मेघयंती, वर्षयंती अणि चुपुणिका अशी नावे लाभलेली आहेत. पावसाळा संपल्यावर ऊन्हे कडक होत जातात, माळरानांवरची तृणपाती परिपक्व झालेली असतात आणि त्यामुळे आग लागून माळराने खाक होतात, पिकलेली पिके जळून खाक होतात आणि त्यामुळे गोव्यातल्या काही आदिवासी भागात कृत्तिका आणि अन्य नक्षत्रांचे रेखाटन करून ‘कातयो’ उत्सवात त्यांचे पूजन करण्याची परंपरा आहे.

इसवी सनाच्या पहिल्या शतकातली पुरातत्त्वीय संचिते कार्तिकेयाचा संबंध अग्नीशी असल्याचे स्पष्ट करतात आणि त्यामुळे आग लागून आपले नुकसान होऊ नये म्हणून त्याची पूजा करतात. उत्तराखंडात रुद्र प्रयाग येथे कार्तिक स्वामीचे जे मंदिर आहे, तेथे कार्तिक पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या जत्रेला भाविकांची गिर्यारोहणाद्वारे गर्दी उसळते. दक्षिण भारतातल्या मंदिरातही या पौर्णिमेला उत्सवांचे आयोजन केलेले असते. परंतु असे असले तरी ही पौर्णिमा देव दिवाळी म्हणूनही साजरी करण्याची परंपरा पाहायला मिळते. कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेच्या दीपदानाच्या सोहळ्याला दिव्यत्त्वाची आणि देवत्वाची किनार लाभल्याचे मानले जाते आणि त्यामुळे मंदिरासमोर पूर्वापार जी दीपमाळ बांधलेली असते, ती तेलाच्या पणत्यांनी प्रज्वलित केली जाते आणि त्यामुळे असंख्य दिव्यांच्या तेजाने ही दीपमाळ प्रकाशमान झालेली असते. मध्ययुगीन कालखंडात इस्लामच्या आगमनाने त्यांच्या वास्तुकलेत आढळणाऱ्या मिनार संकल्पनेतून दीपमाळेचे संचित भारतीय संस्कृतीत विकसित झाल्याचे मानले जात असले तरी दीपलक्ष्मी, दीपदान आदी संकल्पना त्यापूर्वीही रुढ असल्याचे पुरावे आढळतात.

कार्तिक महिन्यात पेटवल्या जाणाऱ्या तेलाच्या दिव्याच्या प्रकाशाकडे कृमी-किटक आकर्षित होतात आणि त्यांच्या प्रादुर्भावाने धान्याचे होणारे नुकसान टळते, असे मानले जाते आणि त्यामुळे दीपदान करण्याची परंपरा निर्माण झालेली आहे. चातुर्मासात श्री विष्णु प्रदीर्घ अशा योगनिद्रेतून प्रबोधनी एकादशीला जागृत होतो आणि त्यासाठी त्याचे तुळशीच्या रोपाशी लग्न लावले जाते. एकादशी ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचा सोहळा एका रात्री पार पडल्यानंतर त्याची समाप्ती कार्तिक पौर्णिमेला करायची असते. त्यानंतर गोवा-कोकणात लग्न सोहळे आयोजित केले जातात. त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर, देवमानव त्रासातून मुक्त झाल्यावर हर्षोल्हासित झाले अणि त्या आनंदाप्रीत्यर्थ देवदिवाळी दिवे प्रज्वलित करून साजरी केली जाते. मानवी जीवनात अग्नीच्या शोधामुळे क्रांती आली आणि अंधारात प्रकाशाचे आगमन झाले. हा अग्नी दिव्याच्या माध्यमातून प्रकाशपर्व निर्माण करू लागला आणि त्यामुळे त्रिपुरारी म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या पर्वदिनी दीपदानाच्या उत्सवाला नवी लकाकी लाभली.

आज मानवी जीवनात असंख्य संकटांचे आक्रमण प्रखर होत असून, त्यामुळे जगण्यातला उत्साह नाहीसा होऊन, नैराश्याच्या गर्तेत आत्महत्येची शिकार होतात आणि जेव्हा आपण निसर्गातल्या ऋतु परिवर्तनात सहभागी होऊ लागतो, तेव्हा आनंदाची दिवाळी येऊन आपले जीवन प्रकाशमान होऊ शकते, अशी आपल्या पूर्वजांची धारणा होती. त्यासाठी वड, पिंपळाच्या पानावर छोटेखानी पेटत्या पणत्या नदीच्या पवित्र प्रवाहात सोडतात आणि दीपमाळ दिव्यांनी सजवितात. कार्तिकातली ही पौर्णिमा वैष्णव, शैव पंथियांतल्या हिंदूंसाठी पर्वदिन ठरलेली आहे. तशीच बौद्धासाठी उत्साह, भक्तीची पर्वणी झालेली आहे. त्यामुळे या दिवशी बुद्ध वंदना श्रद्धेने केली जाते. जैनांसाठी हा उत्सव दिन ठरलेला आहे. गुरु नानकाचा जन्म कार्तिक पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते आणि त्यामुळे शिखांसाठी हा दिवस प्रकाश पर्व ठरलेला आहे. निसर्ग आणि पर्यावरणात विखुरलेले आनंदकण लेवून प्रकाश पर्व साजरे करण्याची परंपरा सत्य, तेज, जीवनाकडे नेत असते.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article