For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजरामर गीतांद्वारे मराठी भाषा गौरव दिन साजरा

10:16 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अजरामर गीतांद्वारे मराठी भाषा गौरव दिन साजरा
Advertisement

लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्रातर्फे जागतिक मराठी दिनानिमित्त बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम : रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद

Advertisement

बेळगाव : मराठी गीतांनी संगीतासोबत भाषाही समृद्ध केली आहे. अभंग, ओवी, गवळण, लावणी, पोवाडे, भक्ती संगीत, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, यातून मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत गेली. अनेक वर्षांपूर्वी संगीतबद्ध झालेली गाणी आजही श्रोत्यांच्या जिभेवर आहेत. अशाच अजरामर गीतांना घेऊन मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे जागतिक मराठी दिनानिमित्त मंगळवारी लोकमान्य रंगमंदिर येथे बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला. ‘ऐसी अक्षरे, स्वरताल रसिक मेळविण’ हा श्रवणीय मराठी गीतांचा कार्यक्रम पहिल्या गीतापासूनच रंगतदार ठरला. मुंबई येथील कलाकारांनी भक्तीगीत, अभंग, लावणी आणि गझल सुरेल पद्धतीने सादर केल्याने बेळगावच्या रसिक श्रोत्यांनी दाद दिली.

महेश कुलकर्णी व ऋषीकेश अभ्यंकर यांनी ‘सप्तसूर झंकारीत बोले’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. महेश व तनुश्री जोग यांनी ऋणानुबंधाच्या गाणे सादर केले. मयुरी चव्हाण यांनी सादर केलेल्या नंद किशोरा या गवळणीला तुफान प्रतिसाद मिळाला. ‘दशरथा घेरे पायसदान, धुंदी कळ्यांना, हा छंद जिवाला लावी’ अशी अप्रतिम गाणी ऋषीकेशने सादर केली. ‘पदरावरती जरतारीचा’ या लावणीला प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली. ‘उगवली शुक्राची चांदनी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, ने मजसीने, शतजन्म शोधताना’, अशी एकाहून एक सरस गाणी कार्यक्रमाला रंगत चढवत होती. शेवटी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ व ‘त्रिवार जयजयकार’ या गाण्यांनी सांगता झाली. विनायक नाईक यांनी तबला साथ दिली. बेळगावचे संतोष गुरव व महेश पवार यांची सुरेल संगीत साथ मिळाली. प्रा. अनिल चौधरी यांनी खुमासदार पद्धतीने कार्यक्रमाचे निवेदन केले. प्रारंभी लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, विठ्ठल प्रभू, निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, नितीन कपिलेश्वरी, विनायक नाईक, महेश कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पंढरी परब प्रास्ताविकात म्हणाले, देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे उलटली. परंतु भाषावार प्रांतरचनेने सीमावर्ती भागातील नागरिकांची ताटातूट झाली. आजही येथे भाषिक सक्ती करण्यात येते. विरोध झुगारून सीमावर्ती भागात मराठीचा जयजयकार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजू नाईक यांनी केले.

Advertisement

अन् रफींनी मराठीतले पहिले गीत गायिले

हिंदीतील नामवंत गायक मोहम्मद रफी यांनी मराठी भाषेत एकही गाणे गायिले नसल्याचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठासून सांगितले होते. त्यानंतर वंदना विठणकर यांच्याकडून एक गाणे लिहून घेण्यात आले. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केले. केवळ बाळासाहेबांच्या आग्रहाखातर रफींनी मराठीतले गीत गायिले. या गीतासाठी रफी यांनी मानधन म्हणून केवळ गुलाबाचे फूल श्रीकांत ठाकरे यांच्याकडून घेतले होते. हे गीत येऊन अनेक वर्षे उलटले तरी आजही ‘हा छंद जीवाला लावी पिसे’ हे गाणे मराठी माणसांच्या जिभेवर रुळले आहे.

Advertisement
Tags :

.