For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यंदाची रंगपंचमी पाण्याविना साजरी करा

10:51 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
यंदाची रंगपंचमी पाण्याविना साजरी करा
Advertisement

पाणी समस्या गंभीर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन : पाणी जपून वापरणे प्रत्येकाची जबाबदारी

Advertisement

बेळगाव : शुक्रवारी असलेल्या जागतिक जलदिनाच्या निमित्ताने पाण्याच्या महत्त्वाबद्दल बरीच चर्चा झाली. तिसरे महायुद्ध पाणी प्रश्नावरुन होण्याची भीती जलतज्ञांनी वर्तविली. पाणी जपून वापरण्याचे आवाहन सातत्याने करण्यात आले. परंतु हे सर्व गांभीर्याने आपण घेणार आहोत का? या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर सोमवारी साजरी होणारी रंगपंचमी पाण्याचा अपव्यय न करता साजरी करण्याचा निर्धार आपण करणार का? हा प्रश्न आहे. बेळगाव शहरातील पाणी टंचाई उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक तीव्र होते. नद्या कोरड्या पडतात. विहिरींचे पाणी तळ गाठते. टँकर फिरू लागतात. त्यासाठी दामदुप्पट पैसे देताना पाणीपुरवठा मंडळ अर्थात एलअॅण्डटी आणि प्रशासन यांच्या नावे आपण बोटेही मोडतो. परंतु पाणी जपून वापरणे ही आपलीही जबाबदारी आहे. याचा सोयीस्कर विसर आपल्याला पडतो.

रेनडान्स प्रमाणात वाढ

Advertisement

कोणतेही सण, समारंभ साजरे करणे ही आपली संस्कृती आहे, त्यामुळे काही क्षण आपल्याला विरंगुळा मिळतो. सार्वजनिकरित्या एकत्रित येणे साध्य होते. त्यामुळे उत्सव आणि सण साजरे करणे यात गैर काहीच नाही. परंतु त्याचवेळी सामाजिक भान विसरले जावू नये. बेळगाव शहरातील होळी आणि रंगोत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. मात्र अलिकडच्या दिवसांत गल्लोगल्ली स्प्रिंक्लर्सची सोय करून पाणी रेनडान्स करण्याचे प्रमाण वाढले आहे.

आंध्रप्रदेश, कर्नाटकातील पाणी समस्या अधिक गंभीर

यामुळे पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होतो. जो करण्याचा अधिकार खरे तर कोणालाच नाही. कोरडे रंग खेळता येतात. परंतु एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचेच ठरवले तर काहीच उपयोग नाही. सध्या बेंगळूरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष तीव्र झाले आहे. दक्षिणेमध्ये आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा व केरळ या राज्यातील जलसाठ्यांमधील पाण्याची पातळी आताच 28 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. त्यातही आंध्रप्रदेश (22 टक्के) व कर्नाटक (29 टक्के) या राज्यांतील स्थिती अधिक गंभीर आहे, असे एका दैनिकाने आपल्या अग्रलेखात नमूद केले आहे.

...तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच

या शिवाय पाण्याची टंचाई भारताला पुढील काळात तीव्रपणे भेडसावणार आहे, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तविला आहे. बेंगळूरमध्ये सध्या पाणी टंचाईची भीषणता जाणवू लागली आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाची साठवणूक करणे त्याकडे आपण लक्ष दिलेले नाही. नद्याही प्रदूषित झाल्या आहेत. भूगर्भातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर पाणी साठवण्याबाबत आपण विचार करण्याऐवजी रेनडान्ससाठी पाणी वाया घालविणार असाल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच. हे प्रकार आपण वेळीच थांबविले नाही तर पुढच्या रंगपंचमीपर्यंत आपल्याला रेनडान्ससाठी नव्हे तर पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होईल की नाही हा प्रश्न आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाचे पालन करा

बेंगळूरमधल्या पाणी टंचाईची दखल माध्यमांनी घेतली आहे. याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. रंगासाठी पाण्याचा वापर करू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. या अनुषंगाने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुद्धा रंगासाठी पाण्याचा वापर टाळा, असे आवाहन केले आहे. फक्त ते कोण अंमलात आणणार हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Advertisement
Tags :

.