रंगपंचमी, रमजान शांततेत पार पाडा
खानापूर येथे शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी यांचे आवाहन
खानापूर : शहरासह पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात होळी, रंगपंचमी आणि रमजान सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडा. तसेच शांतता आणि सुव्यवस्थेसाठी खानापूर पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन खानापूर पोलीस स्थानकात सोमवारी बोलावलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी यांनी व्यक्त केले. बैठकीला शहरातील नागरिक, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरवातीला उपनिरीक्षक एन. बी. बिरादार यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
सण शांततेत साजरे करण्याची परंपरा
होळी, रंगपंचमी आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंबाण्णा होसमणी यांनी शहरात सर्व समाज शांतता आणि गुण्यागोविंदाने नांदत आहेत. सर्व सण शांततेत आणि आनंदाने साजरे करण्याची परंपरा असल्याचे सांगून सर्व समाज एकोप्याने नांदत असल्याचे सांगितले. मुस्लीम समाजातील ज्येष्ठ नागरिक हयातसाब मुल्ला यांनी रमजान आणि होळी दोन्ही शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडू, शहराची शेकडो वर्षाची परंपरा आम्ही अबाधित राखू तसेच नव्या तरुणानीही खानापूरचा आदर्श कायम राखावा, असे आवाहन केले.
बंदोबस्त करण्याची मागणी
प्रकाश देशपांडे, पंडित ओगले, गुड्डूसाब टेकडी यांची भाषणे झाली. दि. 20 मार्च रोजी निंगापूर गल्ली येथील चव्हाटा यात्रेनिमित्त पोलिसांनी बंदोबस्ताची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर, नगरसेवक लक्ष्मण मादार, विनायक कलाल, रवि काडगी, संदीप सुतार, मल्लेशी पोळ, अब्दुल हुदली, समीर नंदगडकरसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.