For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंगाईदेवी यात्रा पशुबळीशिवाय साजरी करा

10:57 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंगाईदेवी यात्रा पशुबळीशिवाय साजरी करा
Advertisement

विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामीजी यांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : बेळगावच्या वडगाव परिसरात दि. 30 रोजी होणाऱ्या श्री मंगाईदेवी यात्रेदरम्यान पशुबळी देणे हा गुन्हा आहे. कर्नाटक पशुबळी प्रतिबंध कायदा-1959 व नियम 1963 नुसार देवाधर्माच्या नावाने पशुबळी देणे हा गुन्हा आहे. त्याबाबतचा आदेशही तत्कालीन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काढला होता. याची नोंद घेऊन मंगाई देवस्थान मंडळाने पशुबळीशिवाय ही यात्रा उत्साहाने व श्रद्धेने साजरी करावी, असे आवाहन विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व प्राणीदया संघटनेचे प्रमुख दयानंद स्वामीजी यांनी केले आहे. मंगळवार दि. 30 रोजी होणाऱ्या मंगाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की मंगाईदेवी यात्रेमध्ये धार्मिक कार्यक्रम जरुर करावेत, मात्र पशुबळी कायद्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला आदेश लक्षात घेऊन तसेच प्राणीबळी निर्बंध कायदा लक्षात घेऊन देवीच्या नावाने पशुबळी दिले जाऊ नयेत.

पशुबळी प्रथा बंद होणे आवश्यक असून त्याबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना भेटीस बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी. यात्रेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले आहे. या दिवशी मांसाहार करण्याची प्रथा असल्यास प्रत्येकाने आपल्या घरी ती प्रथा पार पाडावी. परंतु, देवीच्या नावाने पशुबळी देण्यास कायद्यानेच बंदी असल्याने त्याचे पालन केले जावे. कायद्याचे उल्लंघन केल्यास आपण त्याला तीव्र विरोध तर करूच परंतु न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू, असेही दयानंद स्वामीजी यांनी म्हटले आहे. देवालये ही ध्यानालये, ज्ञानालये होणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी पशुंच्या किंकाळ्या नसाव्यात. देवालयाद्वारे अहिंसा, करुणा, दया आणि मानवता यांचे संस्कार केले जावेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मंगाई जत्रेदरम्यान पशुबळी दिले जाणार नाहीत, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन, पोलीस प्रशासन व मंगाई देवस्थान समितीवर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.