युद्धबंदी उल्लंघन : बाजाराने मोठी तेजी गमावली
सेन्सेक्स 158 अंकांनी तेजीत : तेल कंपन्यांचे समभाग घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात मागील 12 दिवसांच्या युद्ध संघर्षानंतर इराण आणि इस्रायल यांनी युद्धबंदी झाली असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डेनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. परंतु काही तासांमध्येच पुन्हा इराण आणि इस्रायल यांच्याकडून युद्धबंदीचे उल्लंघन झाल्याच्या घटनेमुळे भारतीय बाजाराने प्राप्त केलेली 1000 हजार अंकांची तेजी अंतिमक्षणी गमावली.
मंगळवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 158.32 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 82,055.11 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 72.45 अंकांच्या तेजीसह 25,044.35 वर बंद झाला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही वाढून बंद झाले. मिडकॅप निर्देशांक 0.56 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.71 टक्क्यांनी वाढीसह बंद झाला आहे.
निफ्टी 50 निर्देशांकात, अदानी पोर्ट्स, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, श्रीराम फायनान्स, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि टाटा स्टील हे 2.89 टक्क्यांपर्यंत वाढीसह आघाडीवर होते. दुसरीकडे, निफ्टी 50 मध्ये सर्वाधिक तोटा झालेल्यांमध्ये ओएनजीसी, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, ट्रेंट आणि एचसीएल टेक यांचा समावेश आहे. यामध्ये 2.90 टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी ऑइल अँड गॅस निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात 1 टक्क्यांहून अधिक वाढला. तथापि, नंतर विक्रीवर भर दिसला आणि निर्देशांक घसरणीसह बंद झाला. याशिवाय, निफ्टी पीएसयू निर्देशांकात वाढ दिसून आली. तो 1.39 टक्क्यांवर बंद झाला. निफ्टी ऑइल अँड गॅस, मीडिया आणि आयटी निर्देशांक वगळता सर्व निर्देशांक नकारात्मक बंद झाले.
इराण-इस्रायलमध्ये युद्धबंदी
अध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी रात्री सांगितले की इराण आणि इस्रायलमध्ये आता पूर्ण आणि कायमस्वरूपी युद्धबंदी आहे. त्यांनी याला ‘12 दिवसांच्या युद्धाचा शेवट’ म्हटले आणि अमेरिकेने करारात मध्यस्थी केली असल्याचे सांगितले.