For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यपूर्वेतील युद्धात अखेर शस्त्रसंधी

06:53 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
मध्यपूर्वेतील युद्धात अखेर शस्त्रसंधी
Advertisement

14 दिवसांचा विराम घोषित, आपल्याच अटींवर शस्त्रसंधी झाल्याचे अमेरिका-इराणचे प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी, तेहरान

अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात गेले 39 दिवस होत असलेल्या घनघोर युद्धाला अखेर 40 व्या दिवशी 14 दिवसांचा विराम मिळाला आहे. या शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेने इराणला दिलेला अंतिम कालावधी पूर्ण होण्याच्या आधी दीड तास (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी रात्री दोन वाजता) दोन्ही देशांकडून करण्यात आली. होर्मुझची सामुद्रधुनी इराण वाहतुकीसाठी पूर्णपणे मुक्त करेल, या मुख्य अटीवर ही शस्त्रसंधी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. घोषणा झाल्यानंतर दोन्ही देशांनी, ही शस्त्रसंधी आपल्याच अटींवर झाली असल्याचे प्रतिपादन केले.

Advertisement

या युद्धाचा प्रारंभ 28 फेब्रुवारीला झाला होता. ते 7 एप्रिलपर्यंत चालले. 8 एप्रिलला शस्त्रसंधी घोषित करण्यात आली. या घोषणेचा सकारात्मक परिणाम त्वरित जगभरातील शेअरबाजारांवर दिसून आला. भारतात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 2,900 अंकांनी वाढला. भारताचा रुपयाही जवळपास 88 पैशांनी अधिक बळकट झाला. आता आगामी काही दिवसांमध्ये शेअरबाजार आणि रुपया दोन्हीही वधारत राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त होणार असल्याने तेलवाहक आणि इंधन वायूवाहक नौकांची वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास भारतासह अनेक देशांची इंधन पुरवठा समस्या संपणार आहे. कच्च्या इंधन तेलाच्या दरातही घट झाली असून आता ते 105 डॉलर प्रतिबॅरलवरून 85 डॉलर्सपर्यंत घसरल्याचे दिसत आहे.

भारताकडून स्वागत

या शस्त्रसंधीचे स्वागत भारताने केले आहे. शस्त्रसंधीमुळे आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोणत्याही आणि कोणाच्याही अडथळ्यांशिवाय इंधन आणि इतर वस्तूंची वाहतूक होऊ लागेल, अशी अपेक्षा आहे. या शस्त्रसंधीवर आम्ही समाधान व्यक्त करीत आहोत. सर्व संबंधित देश चर्चेच्या माध्यमातून समस्यांवर तोडगा काढतील आणि भविष्यातही युद्धाचा मार्ग चोखाळणार नाहीत, अशी भारताची सकारात्मक अपेक्षा आहे, असा संदेश भारताने बुधवारी दुपारी प्रसिद्ध केला आहे.

अटीवरच शस्त्रसंधीला मान्यता : डोनाल्ड ट्रम्प

अंतिम कालावधी संपण्याच्या आधी शस्त्रसंधी झालेली आहे. 14 दिवसांचा युद्धविराम मान्य करण्यात आला आहे. तथापि, अमेरिकेच्या युद्धनौका आणि सैनिकही सज्ज राहणार आहेत. इराणने अणुबाँब निर्माण करणार नाही, असे वचन दिले आहे. या अटीवरच शस्त्रसंधीला आम्ही मान्यता दिली आहे. होर्मुझची सामुद्रधुनीही पूर्णपणे मुक्त होईल आणि हे होण्यासाठी अमेरिका साहाय्य करेल. शस्त्रसंधी टिकून राहिल्यास मध्यपूर्वेत प्रगतीचा सूर्योदय होईल. इराणने शब्द पाळल्यास त्याच्यावरचे निर्बंध शिथील करण्यात येतील. अमेरिका इराणशी करार करण्याच्या संदर्भात आशावादी आहे, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

आमच्या अटींवरच शस्त्रसंधी

ही शस्त्रसंधी आमच्याच अटींवर झाली आहे, असा दावा इराणने केला आहे. आम्ही अमेरिकेसमोर झुकणार नाही. आमच्या प्रतिष्ठेशी आम्ही तडजोड केली नाही. पुढेही करणार नाही. शस्त्रसंधी दोन्ही बाजूंनी पाळल्यासच ती स्थायी होईल. इराणच्या हितांचे रक्षण आम्ही प्राणपणाने करू, असे वक्तव्य इराणकडून केले गेले.

अनेक देशांकडून स्वागत

या शस्त्रसंधीचे जगभरात स्वागत होत आहे. ही घटना योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया जपानने व्यक्त केली. ब्रिटन, फ्रान्स आणि युरोपातील इतर देश यांनीही ही शस्त्रसंधी टिकून राहील आणि संबंधित देश सामोपचाराच्या माध्यमातून पुढचा मार्ग काढतील, अशी अपेक्षा या देशांकडून व्यक्त केली गेली आहे. इतरही अनेक देशांनी ही शस्त्रसंधी दीर्घकाळ टिकेल अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत. या घटनेवर एकंदर जगभरात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

इराणने केली विनंती

शस्त्रसंधी करावी अशी विनंती इराणने मध्यस्थ देशांच्या माध्यमातून केल्याने ती अमेरिकेने मान्य केली, असे प्रतिपादन अमेरिकेचे युद्धमंत्री पेट हॅगसेथ यांनी केले आहे. इराणची युद्धयंत्रणा आम्ही 90 टक्के इतक्या प्रमाणात नष्ट केली आहे. आता इराण दुर्बल झाला असून त्याच्याच विनंतीवरून शस्त्रसंधी झाली आहे. शस्त्रसंधीचा भंग इराणकडून झाल्यास आम्ही निर्णायक हल्ला करण्यास सज्ज आहोत, असेही व्यक्तव्य अमेरिकेच्या वतीने हॅगसेथ यांच्याकडून करण्यात आले.

मध्यरात्री घडल्या हालचाली

ड भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता शस्त्रसंधी करण्यात आली. चीन, पाकिस्तान, तुर्किये या तीन देशांनी मध्यस्थी केल्याचे वृत्त

ड पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांनी रात्री अनेकदा अमेरिका आणि इराणच्या नेतृत्वाला फोन केल्यानंतर दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी राजी झाल्याचा दावा

ड चीनची भूमिका महत्वाची ठरल्याचाही दावा. चीननेच पाकिस्तानच्या माध्यमातून शस्त्रसंधी घडविल्याचे काही अमेरिकन वृत्तसंस्थांनी केले आहे प्रतिपादन

ड अमेरिकेने दिलेला अंतिम कालावधी नजीक येत असताना वाढला मध्यस्थांच्या हालचालींचा वेग. अखेर प्रयत्नांना यश. मध्यरात्रीच दोन्हींकडून शस्त्रसंधी घोषित

पाकिस्तानचे प्रयत्न ‘स्क्रिप्टेड’ ?

ही शस्त्रसंधी आपल्यामुळे झाल्याचा दावा करत पाकिस्तानने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, या दाव्याच्या सत्यतेविषयी शंका, शहबाझ शरीफ यांच्या एका कृतीमुळे निर्माण झाली आहे. शरीफ यांनी ‘एक्स’वर एक संदेश पोस्ट केला. या संदेशाचा प्रारंभ ‘ड्राफ्ट मेसेज’ असा असल्याने तो त्यांचा स्वत:चा नसून त्यांना अमेरिका किंवा चीनकडून तो देण्यात आला आणि त्यांनी तो जशाचा तसा ‘एक्स’वर टाकला, अशी टीका आता होत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या दाव्याचे हसे होत असून, सोशल मीडियावर अनेक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या आहेत.

Advertisement
Tags :

.