For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायल-हिजबुल्ला यांच्यात शस्त्रसंधी

01:45 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
इस्रायल हिजबुल्ला यांच्यात शस्त्रसंधी
Advertisement

शुक्रवारी ठरला निर्णय, ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ ल अवीव

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात अखेर शस्त्रसंधी झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या यशासाठी सर्व आघाड्यांवर शांतता निर्माण होणे आवश्यक आहे, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर ही शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करण्यात आली. शुक्रवारी सकाळी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लेबेनॉनमध्ये 18 जण ठार झाले होते. त्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात चर्चा झाली आणि शस्त्रसंधीची घोषणा संध्याकाळी पाच वाजता झाली.

Advertisement

ही शस्त्रसंधी अमेरिका आणि कतारच्या मध्यस्थीने करण्यात आली. इराणलाही यासंदर्भात विश्वासात घेण्यात आले. इराणने हिजबुल्लाच्या नेतृत्वाशी चर्चा करून या संघटनेला शांतता राखण्याची सूचना केली. तर अमेरिका आणि कतार यांनी इस्रायलला हल्ले थांबविण्याची सूचना केली. त्यानंतर इस्रायल आणि हिजबुल्लाचे नेतृत्व यांच्यात दूरध्वनीवरून बोलणी झाली. नंतर शस्त्रसंधी झाल्याचे दिसून आले.

नेतान्याहू शस्त्रसंधीसाठी राजी

नेतान्याहू या शस्त्रसंधीसाठी 100 टक्के राजी आहेत, असे प्रतिपादन एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने केले आहे. हिजबुल्लाने इस्रायलला त्रास न दिल्यास आम्ही त्याच्यावर हल्ला करणार नाही, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तथापि, नेतान्याहू यांच्या कार्यालयाकडून अद्याप या विधानावर प्रतिक्रिया आलेली नाही. तथापि, शुक्रवारी इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात दुपारपर्यंत जी धुमश्चक्री होत होती, ती आता थांबल्याचे दिसून येत आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा मुक्त

इस्रायलने शुक्रवारी सकाळी हिजबुल्लावर जोरदार हल्ला चढविला होता. या हल्ल्यात 18 लोकांचा मृत्यू लेबेनॉनमध्ये झाला होता. त्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात शस्त्रसंधी झाल्याने शुक्रवारी रात्री होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा मोकळी करण्यात आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात 60 दिवस शस्त्रसंधी होईल. या शस्त्रसंधीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाच्या किमती घसरल्या असून आता त्या साधारणपणे 75 डॉलर प्रतिबॅरल इतक्या पातळीवर आहेत.

Advertisement

.