For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीडीएस अनिल चौहान आर्मेनिया दौऱ्यावर

06:49 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सीडीएस अनिल चौहान आर्मेनिया दौऱ्यावर
Advertisement

संरक्षण अन् सुरक्षा सहकार्य वृद्धींगत

Advertisement

वृत्तसंस्था/ येरवान

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान हे एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत आर्मेनियाच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. त्यांच्या या चारदिवसीय दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांदरम्यान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत करणे आहे. भारताच्या सर्वात मोठ्या सैन्याधिकाऱ्याचा आर्मेनिया दौरा त्याला स्वदेशी गायडेड पिनाका रॉकेटची पहिली खेप पाठविल्यावर होतोय. भारत आणि आर्मेनिया यांच्यादरम्यान संरक्षण संबंधांमधील हा उत्साह पाकिस्तान आणि त्याच्या मित्रदेशांची झोप उडविणारा ठरणार आहे.

Advertisement

सीडीएस चौहान यांचा उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबतचा येरेवान दौरा दोन्ही देशांच्या सैन्यसंबंध आणि रणनीतिक भागीदारीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ मुख्यालयाकडून यासंबंधी एक्सवर एक वक्तव्य जारी करण्यात आले आहे. दोन्ही देशांसाठी हा दौरा संयुक्त रणनीतिक हितसंबंधांना पुढे नेणे आणि दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याला मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यात म्हटले गेले आहे.

आर्मेनियाला पिनाका रॉकेटची खेप

सीडीएस चौहान यांच्या स्वागतासाठी येरेवानमध्ये तेथील भारताच्या राजदूत निलाक्षी साहा सिन्हा यांच्यासोबत आर्मेनियन सशस्त्र सैन्याचे उपप्रमुख मेजर जनरल तैमूर शाहनजार्यनही उपस्थित होते. दोन आठवड्यांपूर्वीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतात निर्मित गायडेड पिनाका रॉकेटची पहिली खेप आर्मेनियासाठी रवाना केली होती. या रॉकेटला पुण्यातील सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेडने निर्माण केले आहे. 2022 मध्ये आर्मेनियाने भारताकडून 4 पिनाका रॉकेट सिस्टीम खरेदी करण्यासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा करार केला होता.

पिनाकाचा पहिला आंतरराष्ट्रीय खरेदीदार

आर्मेनिया हा डीआरडीओकडून विकसित पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरचा पहिला आंतरराष्ट्रीय खरेदीदार देखील आहे. भारत संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील आहे, याचबरोबर संरक्षण निर्यातीत जागतिक नेतृत्व करण्याची इच्छा बाळगून आहे. अशास्थितीत आर्मेनियासोबतच्या या संरक्षण कराराचे महत्त्व अधिक आहे. गायडेड पिनाका रॉकेट सिस्टीमपूर्वी भारताने 2024 पर्यत अनगायडेड रॉकेट सिस्टीम्स आर्मेनियाला पुरविल्या होत्या.

आर्मेनियाचे भौगोलिक महत्त्व

आर्मेनिया हा देश इराण, रशिया, अझरबैजान या देशांच्या सीमेला लागून आहे. दुसरीकडे आर्मेनिया हा पाकिस्तानशी फारशी जवळीक राखणारा देश नाही. आर्मेनियाचा अझरबैजान या मुस्लीम देशासोबत वारंवार संघर्ष होत असतो. या संघर्षात पाकिस्तानने अझरबैजानला थेट मदत केल्याने आर्मेनियाने भारताशी जुळवून घेतले आहे. आर्मेनिया हा देश भारताला मध्य आशियामार्गे युरोपमध्ये भूमार्गाने पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.