कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

11:57 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती : वायव्य परिवहन मंडळाची विकास आढावा बैठक

Advertisement

बेळगाव : प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी वायव्य परिवहन मंडळाने पावले उचलावीत. वायव्य मंडळाच्या अखत्यारित बेळगाव, चिकोडी व धारवाड विभाग कार्यरत आहेत. त्यानुसार विभागीयदृष्ट्या नवीन गाड्या, कर्मचाऱ्यांची समस्या, नूतन कर्मचारी नियुक्ती, नूतन बसस्थानके व नूतनीकरण याबाबत मुख्यमंत्री व परिवहनमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रात येणाऱ्या जागांची ओळख करून घेऊन ती ताब्यात घ्यावी. आता बेंगळूरच्या धर्तीवर बसस्थानक व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

Advertisement

शहरातील हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयाच्या सभाभवनात आयोजित वायव्य मंडळाच्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. बेळगाव बसस्थानक-1 च्या नूतनीकरणासाठी 7 कोटी 85 लाख अनुदानाची आवश्यकता आहे. बेळगाव विभागात 135 तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असून त्यापैकी खासगी (कंत्राटी पद्धत) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कित्तूर बसस्थानकाचे काम पूर्ण झाले असून डिझेल टँकचे काम शिल्लक राहिले आहे. चिकोडी विभागातील मुडलगी येथे नूतन डेपो व बसस्थानक निर्माण करण्यासाठी सरकारकडून जागा आणि अनुदान देण्यात यावे, अशी विनंती अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

3 विभागातून दररोज 1608 बसेस

चिकोडीत विभागीय कार्यशाळा निर्माण करण्यासाठी 6 कोटी 85 लाख, संकेश्वर बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी 9 कोटी व चिकोडी बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी 9 कोटी अनुदानाची गरज आहे. वायव्य परिवहन मंडळाकडून तीन विभागातून दररोज 1608 बसेस धावत आहेत. शक्ती योजनेच्या अगोदर 5 लाख 40 हजार नागरिक प्रत्येक दिवशी प्रवास करत होते. मात्र योजनेनंतर 7 लाख 89 हजार दररोज प्रवास करत असून प्रतिदिनी 2 लाख 49 प्रवाशांची भर पडत आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

645.13 कोटी शून्य शुल्क तिकिटे वितरित

शक्ती योजनेंतर्गत 11 जून 2023 ते 27 जून 2025 अखेर (748 दिवस) 59 कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून यामध्ये 38.40 कोटी महिलांनी प्रवास केला आहे. याद्वारे महिलांना 645.13 कोटी रुपयांची शून्य शुल्क तिकिटे वितरित करण्यात आली आहेत. सध्या विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या एकूण 636 वेळापत्रकांसाठी 60 कर्मचाऱ्यांची कमतरता असून येत्या काळात वाहनांची मागणी व पुरवठा लक्षात घेतल्यास 530 तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.

विविध कामांसाठी 30 कोटी निधीची गरज

बेळगाव विभागातील बेळगाव उत्तरमध्ये विभागीय कार्यालय व बसस्थानक-3, बैलहोंगल बसस्थानकाचे उर्वरित काम, खानापूर तालुक्यातील लोंढा व हलशी बसस्थानकाचे काम, सुळेभावी बसस्थानक, कित्तूर बसस्थानक या विविध कामांसाठी 30 कोटी निधीची गरज आहे. बेळगाव येथील नूतन बसस्थानक स्मार्ट सिटीअंतर्गत बांधण्यात आले आहे. बसस्थानकाच्या मध्यभागी देवस्थान असून यासाठी पर्यायी जागा देऊन स्थलांतर करण्यात आले आहे. तेथे काँक्रिटीकरणाचे काम स्मार्ट सिटीद्वारे करण्यात येणार आहे.

चिकोडी विभागासाठी 39 कोटी अनुदानाची गरज

चिकोडी विभागातील काही गावांना अद्याप बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. यामध्ये चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी व अंमलझरी, रायबाग तालुक्यातील गिरिनायकवाडी तर गोकाक तालुक्यातील मलामरडी व गड्डीहोळी गावांना बस सोडण्यात आलेली नाही. प्रवासी व विद्यार्थ्यांना सोईस्कर व्हावे, यासाठी वस्ती बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पण चालक व वाहकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. यासाठी जि. पं. सीईओंना पत्र पाठवून संबंधित ग्रा. पं. कडून सदर बसचालक-वाहकांना सुविधा पूरविण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. चिकोडी विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या बस डेपो व बसस्थानकांच्या कामांसाठी 39 कोटी अनुदानाची गरज आहे.

यावेळी परिवहन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजू कागे, आमदार राजू सेठ, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनीही अधिकाऱ्यांना विविध सूचना देऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी गोकाक महालक्ष्मी यात्रेसाठी अधिक 20 बसेस सोडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वायव्य परिवहन मंडळाच्या एमडी प्रियांगा यांच्यासह विभागीय अधिकारी उपस्थित होते.

वायव्य परिवहन मंडळाचे होणार संगणकीकरण

वायव्य परिवहन मंडळाचे काम सोपे व संगणकीकरण होण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. चालक-वाहकांसाठी ड्युटी रोटा, आयएमएस, बसथांबा व व्यवस्थापन मूल्यांसाठी क्यूआर कोड, प्रवासी फिडबॅक प्रणाली, बस डेपो व बसस्थानकाचे संगणकीकरण, वेतनाचे तांत्रिकरण व ऑनलाईन वेतन पावती,  ऑनलाईन रजा, ऑनलाईन एलएमएस, ऑनलाईन पीएफ सुविधा, युपीआय, कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी आदी व्यवस्था करण्यात येत आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article