खानापूर शहरात तिसरा डोळा कार्यान्वित
शिवस्मारक चौकात सीसीटीव्ही कॅमेरा सक्रिय
खानापूर : येथील राजा शिवछत्रपती चौकात जिल्हा पोलीस प्रमुख व भूगर्भ खात्याच्या जिल्हा उपसंचालकांच्या निर्देशानुसार सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सतत नजर राहणार असून याची संपूर्ण माहिती जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कार्यालयात पोहोचणार आहे. त्यामुळे शहरात होणाऱ्या गुन्हेगारीवर आणि भुरट्या चोऱ्यांवर तसेच अवैद्य वाळू आणि इतर खनिजांच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी हा सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसाढवळ्या सीसीटीव्ही बसविण्यात येत असल्याची कोणतीही माहिती नगर पंचायतीकडे अथवा खानापूर पोलिसांनाही नव्हती. गेल्या काही दिवसांपासून शहरासह बसस्थानक परिसरात भुरट्या चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. तसेच तालुक्यातून अवैद्य वाळूसह इतर खनिजाची वाहतूक राजरोसपणे करण्यात येत होती.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जिल्हा पोलीस प्रमुख व भूगर्भ खात्याचे उपसंचालकांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. या बैठकीत तालुक्यातील नंदगड, बिडी, आणि खानापूर येथे सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राजा छत्रपती चौकात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या ठिकाणी हायटेक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम पूर्ण झाले असून हा सीसीटीव्ही कॅमेरा येत्या काही दिवसांत कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे आता खानापूर शहरावर थेट जिल्हा पोलीस प्रमुखांची नजर राहणार आहे. खानापूर शहरासह बिडी, नंदगड येथेही हायटेक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. शहरात खांब उभारुन सीसीटीव्ही बसविण्यात येत होता. याबाबत नगरपंचायत अधिकाऱ्यांना विचारले असता काहीच माहिती नसल्याचे सांगण्यात आले. तर खानापूर पोलिसांनीही याची कल्पना आपल्या खात्याला नसल्याचे सांगितले. दिवसा कॅमेरा बसविण्यात येत असताना संबंधित खात्याचे अधिकारीच दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शहरात कोणतीही अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.