सीसीआयचा ‘मेटा’ला 213 कोटींचा दंड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोशल मिडिया क्षेत्रातील मोठी कंपनी असणाऱ्या ‘मेटा’ला केंद्र सरकारच्या ‘काँपिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ या संस्थेने 213.14 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अनधिकृतरित्या ग्राहकांची व्यक्तीगत माहिती अन्यांना पुरविण्याच्या संदर्भात हा दंड आहे. मात्र, मेटाने या दंडासंबंधी नाराजी व्यक्त केली असून ही कारवाई कंपनीला मान्य नसल्याचे प्रतिपादन केले आहे.
हा दंड व्हॉटस्अपशी माहिती शेअर केल्यासंदर्भात आहे. संस्थेने व्हॉटस्अपलाही समज दिली असून आपल्याकडील ग्राहकांची व्यक्तीगत माहिती कोणालाही अनधिकृतरित्या देऊ नये, असा इशारा दिला आहे. व्हॉटस्अपही मेटाचीच उपकंपनी असून ती संदेशवहन क्षेत्रात जगप्रसिद्ध आहे. व्हॉटस्अपने मेटा कंपनीच्या स्वामित्वात काम करणाऱ्या कोणत्याही कंपनीला अशा प्रकारे कोणाचाही व्यक्तीगत डाटा शेअर करु नये, असे सीसीआयने बजावले आहे.
काँपिटिशन कमिशन काय आहे...
काँपिटिशन कमिशन किंवा स्पधात्मकता आयोग ही केंद्र सरकार नियंत्रित संस्था असून ती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तसेच अन्य क्षेत्रांमधील कंपन्यांच्या स्पर्धात्मक वर्तणुकीवर लक्ष ठेवून कारवाई करते. कोणत्याही कंपनीने तिच्या कार्यक्षेत्रातील अन्य कंपन्यांशी स्पर्धा करताना अवांछनीय (अनफेअर) मार्गांचा किंवा तंत्रांचा उपयोग केल्यास अशा कंपनीवर कारवाई करण्याचा अधिकार या संस्थेला आहे.
प्रकरण काय आहे...
व्हॉटस्अप ही कंपनी संदेशवहन क्षेत्रात जगप्रसिद्ध असून भारतातही तिचे कोट्यावधी ग्राहक आहेत. ही कंपनी मेटा या मातृकंपनीची उपकंपनी आहे. व्हॉटस्अप आणि मेटा या दोन्ही कंपन्यांकडे त्यांची सेवा घेणारे ग्राहक किंवा खातेदारांची व्यक्तिगत माहिती संकलित झालेली असते. ही माहिती या कंपनीने तिच्या अन्य जोडीदार कंपन्यांना पुरवू नये, असा व्यावसायिक नैतिकतेचा संकेत आहे. तथापि, मेटा आणि व्हॉटस्अप या कंपन्यांवर अशी माहिती त्यांच्या इतर कंपन्यांना अवांछनीय पद्धतीने पुरविल्याचा आक्षेप अनेक ग्राहकांनी घेतल्यानंतर सीसीआयने या प्रकरणाचा तपास केला. आक्षेपांमध्ये तथ्य आढळून आल्याने मूळ मेटा कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात जाऊ शकते.