For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीबीटी बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

11:07 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीबीटी बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात
Advertisement

लवकरच प्रवाशांच्या सेवेत, अंतर्गत कामांना वेग

Advertisement

बेळगाव : मागील पाच ते सहा वर्षांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या सीबीटी बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यातील फर्निचर आणि अंतर्गत इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या दोन महिन्यांत बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. तब्बल 31 कोटींच्या निधीतून मध्यवर्ती आणि सीबीटी बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. यापैकी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. सीबीटीचे काम कोरोना आणि इतर कारणांमुळे लांबणीवर पडले होते. मात्र आता कामाला जोर आला असून अखेरच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे सुसज्ज सीबीटी बसस्थानक लवकरच सेवेत दाखल होणार आहे. 2018 मध्ये जुने बसस्थानक हटवून त्या ठिकाणी नवीन बसस्थानकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र कोरोना आणि इतर कारणांमुळे बसस्थानकाच्या कामाला तब्बल पाच वर्षांचा कालावधी लागला आहे. राज्यातील भाजप सरकार सत्तेत असताना 2023 मध्ये मध्यवर्ती बसस्थानकाचे थाटात उद्घाटन झाले. अधिवेशनकाळात घाईगडबडीत उद्घाटनाचेही काम उरकून घेण्यात आले. मात्र या बसस्थानकातही फलाट आणि इतर कामे शिल्लक असल्याचे दिसत आहे. सीबीटी बसस्थानकाच्या कामात मध्यंतरी अडथळा आला होता. कॅन्टोन्मेंट हद्दीत हा भाग असल्याने कॅन्टोन्मेंटने नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे काहीकाळ कामालाही स्थगिती मिळाली होती. मात्र परिवहन आणि कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून मार्ग काढला. त्यानंतर पुन्हा कामाला चालना मिळाली होती.

तळमजल्यात पार्किंगची व्यवस्था

Advertisement

सीबीटी बसस्थानकाच्या तळमजल्यात सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाचवेळेला हजारो वाहने पार्क होतील, या क्षमतेची पार्किंग व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची समस्या दूर होणार आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या बहुमजली इमारतीत कार्यालय, यात्रा निवासी, शौचालय, पास काऊंटर, आगाऊ बुकिंग काऊंटर उपलब्ध करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत बसस्थानकातील अंतर्गत फरशी, फर्निचर, इलेक्ट्रीक आणि इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील महिन्यात काम पूर्ण होईल, अशी माहितीही स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.