मणिपूरसंबंधी तपासाला सीबीआयकडून गती
अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू : अन्य संशयितांचा शोध जारी
► वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील हिंसाचार आणि व्हायरल झालेल्या विवस्त्र महिलांच्या धिंड प्रकरणाच्या तपासाला सीबीआयने पहिल्याच दिवसापासून गती दिली आहे. आतापर्यंत सात-आठ आरोपींना अटक झाली असली तरी अन्य संशयिताना ताब्यात घेण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. सीबीआयने याप्रकरणी एकूण 6 एफआयआर नोंदवले असून कोठडीत अनेकांची चौकशी केली जात आहे. याशिवाय महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी सीबीआय स्वतंत्र एफआयआर नोंदवण्याच्या तयारीत आहे.
महिलांच्या व्हिडिओचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे. याप्रकरणी मणिपूर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या 8 जणांना अटक केली आहे. मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून जमावाने विवस्त्र करून परेड केल्याची घटना 19 जुलै रोजी समोर आलेल्या व्हिडिओद्वारे समोर आली होती. सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलै रोजी या घटनेची दखल घेत सरकारला तातडीने योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र आणि मणिपूर सरकारला तात्काळ खबरदारीचे उपाय करण्याचा इशारा दिला. मणिपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल झाली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी अपेक्षित होती. मात्र, खंडपीठातील न्यायमूर्तींच्या अनुपलब्धतेमुळे ही सुनावणी लांबणीवर पडली आहे.