For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संदीप घोषसह अनेकांवर सीबीआय धाडी

06:40 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
संदीप घोषसह अनेकांवर सीबीआय धाडी
Advertisement

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी तपास वेगाने

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात 9 ऑगस्टला घडलेल्या भीषण बलात्कार-हत्या प्रकरणाच्या संदर्भात सीबीआयने महाविद्यालयाचा माजी प्राचार्य संदीप घोष आणि 14 संशयितांच्या निवासस्थानांवर धाडी घातल्या आहेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यासंबंधीच्या या धाडी होत्या, अशी माहिती सीबीआय प्रवक्त्याने रविवारी दिली आहे.

Advertisement

सीबीआयच्या अनेक अधिकाऱ्यांनी या धाडींमध्ये भाग घेतला. सात सीबीआय अधिकाऱ्यांनी संदीप घोष याची त्याच्या बेलियाघाटा येथील निवासस्थानी कसून चौकशीही केली. तसेच महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य वसिष्ट यांचीही चौकशी अधिकाऱ्यांनी केली. महाविद्यालयाच्या गुन्हा विज्ञान शाखेच्या प्राध्यापकाचीही चौकशी करण्यात आली आहे. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रारंभ करण्यात आलेली ही चौकशी रात्रीपर्यंत चालली होती. धाडींमध्ये मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि इतर पुरावे हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे.

सहा वाजताच उपस्थित

अनेक सीबीआय अधिकारी रविवारी सकाळी सहा वाजताच संदीप घोष याच्या निवासस्थानी उपस्थित झाले. या अधिकाऱ्यांना केंद्रीय सुरक्षा दलांचे संरक्षण होते. त्यांना घराबाहेर दीड तास वाट पहावी लागली. साडेसात वाजण्याच्या आसपास त्यांना घरात प्रवेश करण्याची अनुमती मिळाली. त्यानंतर झडतीला प्रारंभ करण्यात आला. अधिकाऱ्यांनी घोष याच्या रुग्णालयाचे कार्यालय आणि महाविद्यालयाच्या कँटीनचीही झडती घेतली. सीबीआय प्रवक्त्याने ही माहिती दिली.

होऊ शकते अटक

महाविद्यालयाचा माजी प्राचार्य संदीप घोष याच्यावर बलात्कार आणि हत्या प्रकरणात ढिलाई दाखविल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे झाडले आहेत. तसेच त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोपही आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची चौकशीही सीबीआयच्या हाती दिली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये सीबीआयकडून त्याला अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्यासह महाविद्यालयातील चार डॉक्टर्सही या प्रकरणातील संशियत असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

संजय रॉय याची पॉलिग्राफी

बलात्कार आणि हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी संजय रॉय याची पॉलिग्राफिक चाचणी रविवारी घेण्यात आली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून कारागृहात जाऊन सीबीआय अधिकारी आणि अन्य तज्ञांनी त्याची असत्य चाचणी पूर्ण केली. या चाचणीतून काय निष्पन्न झाले हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही. तसेच हे कांड घडविणारा तो एकच आरोपी आहे, की हे सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आहे, यासंबंधी अद्यापही स्पष्टता नाही. सीबीआयने आतापर्यंतच्या वक्तव्यांमध्ये हे सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आहे, असे स्पष्ट केलेले नाही. मात्र, ती शक्यता फेटाळलेलीही नाही.

Advertisement
Tags :

.