विषारी दारु प्रकरणी सीबीआय चौकशी
वृत्तसंस्था / चेन्नई
काही दिवसांपूर्वी तामिळनाडू राज्यात गाजलेल्या कल्लाकुरीची विषारी दारुबळी प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, असा महत्वपूर्ण आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. हा आदेश राज्यातील द्रमुक सरकारला झटका असल्याचे मानले जात आहे. या विषारी दारुकांडात 68 जणांचा बळी गेला होता.
मद्रास उच्च न्यायालयाचे न्या. डी. कृष्णकुमार आणि न्या. पी. बी. बालाजी यांच्या खंडपीठाने बुधवारी हा आदेश दिला. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून केली जावी, अशी मागणी करणारी याचिका तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्ष असणाऱ्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने सादर केली होती. भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू शाखेचे नेते ए. मोहन दास हेही या याचिकेत सहभागी आहेत. तामिळनाडूत विषारी दारुची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती कोणत्या थराला गेली आहे, हे अशा शोकातिकांवरुन दिसून येते. राज्यातील द्रमुकच्या नेतृत्वातील सरकारकडून या प्रकरणांच्या चौकशीत ढिलाई केली जात आहे. त्यामुळे कल्लाकुरीची प्रकरण सीबीआयच्या हाती सोपवावे, असे प्रतिपादन याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत केले होते. सुनावणीनंतर ही याचिका मान्य करण्यात आली आहे.