For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गैरव्यवहाराचे ‘उत्तर’ शोधण्यास प्रारंभ

12:31 PM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
गैरव्यवहाराचे ‘उत्तर’ शोधण्यास प्रारंभ
Start looking for 'answers' to corruption
Advertisement

कॅन्टोन्मेंटमध्ये सीबीआयकडून उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत सीबीआयकडून पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. नोकर भरतीसाठी घेण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांची बुधवारी सीबीआयकडून सखोल तपासणी करण्यात आली. उमेदवारांनी लिहिलेले उत्तर व त्याला देण्यात आलेले गुण याची नोंद केली. त्यामुळे सीबीआयचे त्रिसदस्यीय पथक दिवसभर कॅन्टोन्मेंट कार्यालयात ठाण मांडून होते. 2022-23 या वर्षामध्ये कॅन्टोन्मेंटमध्ये 29 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. शिपाई, वॉचमन, हमाल, कुली, चौकीदार, मजदूर, मेकॅनिक असिस्टंट, तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु या भरती प्रक्रियेतील काही उमेदवारांकडून प्रत्येकी 15 ते 25 लाख रुपये घेऊन नोकरी देण्यात आल्याची तक्रार सीबीआयकडे कॅन्टोन्मेंटचे सदस्य सुधीर तुपेकर यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत नोव्हेंबर 2023 पासून सीबीआयकडून पदभरतीतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे.

नोकर भरतीतील गैरव्यवहाराचा ठपका ठेवत 5 अधिकारी व 14 उमेदवारांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सहा महिन्यांपूर्वी बेंगळूर येथे बोलावून काहींची चौकशी झाली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून सीबीआयचे पथक पुन्हा बेळगावमध्ये दाखल झाले आहे. बुधवारपासून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सभागृहात सर्व उमेदवारांच्या उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. त्याचबरोबर त्यांनी अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे, गुणपत्रिका यांचीही सखोल तपासणी झाली. या कामासाठी कॅन्टोन्मेंटमधील काही कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याने कार्यालयात शांतता होती. पहिल्या दिवशी चार उमेदवारांची चौकशी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

भरती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह...

कॅन्टोन्मेंटमधील भरतीसाठी संपूर्ण देशभरातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु केवळ बेळगावमधून अर्ज केलेल्या उमेदवारांनाच अंतिम नियुक्ती देण्यात आली. मर्जीत नसलेल्या उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. नियुक्त केलेले उमेदवार हे अधिकाऱ्यांचे नातेवाईक, तसेच परिचयाचे असल्याचे सीबीआयने बेंगळूर येथे जून 2024 मध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.