For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात पावसाळी पर्यटनात हवी सावधगिरी

06:25 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात पावसाळी पर्यटनात हवी सावधगिरी
Advertisement

गोव्यात पर्यटक बुडतात आणि स्थानिकही बुडतात, याच्या मूळ कारणाशी जाण्याची आवश्यकता आहे. आपण आज प्राथमिक शाळेतल्या मुलांना खूप काही शिकवतो एवढेच नव्हे, तर त्या ‘बाजार डे’ मधून व्यवसाय कसा करायचा, हेही शिकवतो. मात्र पोहायला कुठे शिकवतो? जगाला गवसणी घालायला शिकवायचे, पण स्वत:चा जीव वाचविण्याबद्दल काय?

Advertisement

निसर्गसंपदेने समृद्ध गोव्याचे देश-विदेशांतील पर्यटकांना 365 आकर्षण असते. पावसाळ्यात तर गोव्यातील पाऊस, निसर्ग, धबधबे जणू काही पर्यटकांना आपल्याकडे खेचूनच आणत असतो. हे आकर्षण केवळ पर्यटकानांच नव्हे, तर स्थानिकांमध्येही आहे. मात्र गोव्याचे हे सौंदर्य भावी पिढ्यांना राहील की नाही, हे काही सांगता येत नाही. आज गोव्यात बेकायदेशीरपणाला जी ‘राजमान्यता’ मिळत आहे, ती पाहता गोव्यातील निसर्गाचा ऱ्हास होऊन काँक्रीटचा गोवा म्हणजे ‘स्मार्ट गोवा’ उभा राहील. तरीही आजच्या काळात जे पर्यटक गोव्यात येतात त्यांची सुरक्षा मात्र स्थानिकांपेक्षाही अधिक पाहिली जाते. पर्यटकांना कुठेही, कसलाही त्रास होता कामा नये, भले त्यांनी नियम धाब्यावर बसविले तरी चालतील, असा अलिखित आदेशच चालतोय की काय? असे वाटावे. काहीही असो जे पर्यटक येतात त्यांनी आनंद लुटायलाच हवा, पण त्यासाठी सावधगिरी बाळगायला नको काय? हजारो किलोमीटरचा प्रवास करुन गोव्यात यायचे, हजारो किंवा लाख रुपये खर्च करायचे आणि सावधगिरी न बाळगल्याने प्राणांना मुकायचे... हे कोणाला बरे आवडणार? गोव्यात सध्या पावसाळी पर्यटन बहरास आलेले आहे. त्याचा आनंद लुटताना पर्यटकांबरोबरच स्थानिक लोकही नदीत, धबधब्यावर बुडून प्राणास मुकतात, ही खूप वेदनादायी, चिंताजनक बाब आहे.

गेल्या तीन महिन्यात गोव्यात बुडण्याच्या ज्या घटना घडल्या त्या ह्य्दय हेलावून टाकणाऱ्या आहेत. एकेकाळी गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर बुडणाऱ्या पर्यटकांची संख्या वेदनादायी होती. मात्र सरकारने ‘दृष्टी’चे जीवरक्षक तैनात केल्यामुळे आता बुडणाऱ्या हजारो पर्यटकांना वाचविले जाते. ही परिस्थिती आता पावसाळी पर्यटनात नद्या व धबधब्यांच्या ठिकाणी आलेली आहे. दुधसागर धबधबा संपूर्ण जगात सौंदर्यासाठी गाजत आहे, तेव्हढाच लोक बुडण्याच्या घटनांनीही तो बदनाम होत आहे. अन्य धबधब्यांचीही तीच परिस्थिती आहे. पर्यटकच बुडतात अशातला भाग नाही, स्थानिकही बुडतात आणि प्राणांस मुकतात. पर्यटक असो वा स्थानिक, ज्या तरुण मुलांचे जे असे बळी जातात, ते म्हणजे केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नुकसान असते, दु:ख असते असे नाही. ती समाजाची, राज्याची आणि या राष्ट्राच्या भवितव्याचीही फार मोठी हानी असते.

Advertisement

नेत्रदीपक, उर्जादायी या जलप्रपातांचा आनंद लुटताना कुणाचाही बळी जाऊ नये, म्हणून सर्वांत अगोदर त्या परिसरात जाणाऱ्यांनी स्वत:ची खूप काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकले पाहिजे. निसर्गाचा आनंद घेताना मद्य, अंमलीपदार्थांचे सेवन करुन निसर्गदेवतेचा अपमान करता कामा नये. तेथील राखणदारांच्या पावित्र्याचा भंग होता कामा नये. आपणास पोहता येते की नाही? हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. पोहता येत असले तरी आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहू शकतो काय? अचानक ढगफुटीसारख्या पडणाऱ्या पावसाने जलप्रपाताचा जोर वाढला तर त्याच्यापुढे आपण टिकाव धरु शकणार काय? याचा विचारायला हवा. अन्यथा जिथे खोली नाही, प्रवाह हळुवार आहे, अशा ठिकाणी राहून किंवा आंघोळ करुन धबधब्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यांत साठवून घेतले तर ते पुढील काळासाठी उत्साहवर्धक, सृजनशील ठरते आणि आपले प्राणही वाचतात. कुटुंबाची, राष्ट्राची नुकसानी टळते.

गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. देविया राणे यांनी धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या स्थानिकांच्या, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महामंडळाने जी मार्गदर्शक पावले उचलली आहेत त्यांची माहिती सार्वजनिक केली आहे. ती वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडियावरुन सर्वत्र पोहोचली पाहिजे. कारण ती बुडणारे जीव वाचविण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहेत. गोव्यातील दुधसागर, पाली, मैनापी, चरावणे, नानेली, सावरी व अन्य धबधब्यांच्या ठिकाणी महामंडळाने टुरिस्ट गाईड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वन विकास महामंडळाच्या काही निवडक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून त्यांना त्या ठिकाणी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्यावतीने हा निर्णय समाधानकारक आहे. तरीही स्वत:ची काळजी घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

गोव्यात पर्यटक बुडतात आणि स्थानिकही बुडतात, याच्या मूळ कारणाशी जाण्याची आवश्यकता आहे. आपण आज प्राथमिक शाळेतल्या मुलांना खूप काही शिकवतो एवढेच नव्हे, तर त्या ‘बाजार डे’ मधून व्यवसाय कसा करायचा, हेही शिकवतो, मात्र पहिली ते कॉलेजपर्यंत किंवा विद्यापीठापर्यंतच्या शिक्षणात कुठेही अर्धा तासांच्या पीई म्हणजे शारीरिक शिक्षणात किंवा अन्य जे क्रीडा प्रकार शिकवितात त्यामध्ये स्विमिंगला म्हणजे पोहण्याला कुठे स्थान आहे? जगाला गवसणी घालायला शिकवायचे आणि आपले प्राण वाचविण्याचा शिक्षणाचा लवलेशही नसणे, ही प्रगती म्हणायची काय? ग्रामीण असो वा शहरी भागातील नव्वद टक्क्यांहून अधिक मुलांना पोहायला येत नाही, हे खडे वास्तव कोण नाकारु शकेल? पोहायला शिकविणे हे गोव्याच्या तसेच भारतीय शिक्षणात सक्तीचे असायला हवे. ते जेव्हा होईल, तेव्हाच हे बुडणारे जीव वाचू शकतील.

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :

.