जनावरे-पक्ष्यांच्या अडथळ्यांमुळे विमानतळ परिसरात सावधगिरी
धावपट्टी मोकळी केल्यानंतर विमानोड्डाणाला परवानगी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळ परिसरात कोल्हे, कुत्रे तसेच पक्ष्यांचे प्रमाण वाढले आहे. परिसरात टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यामुळे ही समस्या वाढीस लागली आहे. मुख्य धावपट्टीवर कुत्रे, कोल्हे येऊ नयेत, यासाठी वेगळी यंत्रणा विमानतळ प्रशासनाला राबवावी लागत आहे आणि तसे आढळल्यास विमानाचे उड्डाण थांबवून कुत्रे-कोल्हे यांना बाजूला हटवून मगच विमानाला वाट मोकळी करून दिली जात आहे.
सांबरा गावाशेजारीच बेळगाव विमानतळ आहे. विमानतळाच्या संरक्षक भिंतीबाहेरच अनेक ठिकाणी कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यामध्ये बऱ्याच वेळा अन्नपदार्थ तसेच चिकन-मटणचे उरलेले अवशेष असतात. त्यामुळे कुत्र्यांची संख्या बऱ्याच वेळी वाढली जाते. त्याचबरोबर विमानतळाच्या दुसऱ्या बाजूला उसाची शेती असल्यामुळे तेथून कोल्हे विमानतळ परिसरात दाखल होतात. तसेच पक्ष्यांचाही धोका वेळोवेळी निर्माण होत असतो.
विमान धावपट्टीवर उतरत असेल किंवा झेप घेत असेल तर धावपट्टी परिसरात कोल्हे, कुत्रे अथवा पक्षी आल्यास विमानाला अडथळा निर्माण होतो. यामुळे मोठे अपघातही घडण्याची शक्यता असते. बेळगाव विमानतळावर अनेक वेळा कोल्हे येत असतात. त्यावेळी फटाक्यांचा आवाज करून त्यांना पळवून लावावे लागते. परिसरात टाकण्यात येत असलेला कचरा यासाठी कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
विमानतळ परिसरात कोल्हे, कुत्री, पक्ष्यांचा वावर
त्यागराजन (संचालक, बेळगाव विमानतळ)
बेळगाव विमानतळ परिसरात कोल्हे, कुत्रे तसेच पक्ष्यांचा वावर आहे. तो बंद करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्या मदतीने भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबविली जाते. त्याचबरोबर चिकन-मटण शॉपचे उर्वरित अवशेष विमानतळ परिसरात टाकले जाणार नाहीत, यासाठी परिसरातील ग्राम पंचायतींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनीही अनेक उपाययोजना सांगितल्या आहेत