For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने मनपाकडून खबरदारी

11:47 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने मनपाकडून खबरदारी
Advertisement

मनपा आयुक्तांनी घेतली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची बैठक : विविध ठिकाणी घरोघरी जाऊन केल्या सूचना

Advertisement

बेळगाव : शहरामध्ये डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण आढळल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ज्या परिसरात रुग्ण सापडले आहेत. त्या परिसरात तातडीने घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती घ्यावी. याचबरोबर खबरदारी घेण्याबाबत सूचना कराव्यात, असे त्यांनी गुरुवारी तातडीने आदेश दिले. यासाठी महानगरपालिकेचे अधिकारीही मदत करतील. मात्र समन्वय ठेवून हे काम करा, असे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी आदेश देताच तातडीने न्यू गांधीनगर, रुक्मिणीनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर परिसरात घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. पाण्याचा साठा असेल तर तातडीने तो साठा काढून नव्याने पाणी भरण्याची सूचना करण्यात येत आहे. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी तर शुक्रवारी सकाळपासूनच या परिसरात सर्व्हे करणाऱ्यांवर नजर ठेवली. प्रत्येकाच्या घरात जाऊन पाण्याचा साठा तपासा. तसेच कोणतीही व्यक्ती आजारी असेल तर त्याची संपूर्ण माहिती देण्याची सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना केली आहे.

गेल्या चार दिवसांमध्ये न्यू गांधीनगर, शिवाजीनगर, रुक्मिणीनगर आणि वीरभद्रनगर या परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर खबरदारी म्हणून ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांनी तुम्हाला हवी ती मदत करू. मात्र डेंग्यू तसेच इतर साथीच्या आजारांबाबत जनजागृती करा, असे त्यांनी सांगितले आहे. फ्ल्यू, चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरिया यासारखे रुग्ण आढळल्यानंतर त्याची माहिती मनपाला ताबडतोब द्या, असे आरोग्य विभागाला सांगण्यात आले आहे. डेंग्यूचे रुग्ण ज्या परिसरात आढळले आहेत. त्या परिसरातील 100 मी. अंतरावरील सर्व घरातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांची विचारपूस करा, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या या प्रत्येकाच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत. डासांची अळी आढळल्यास तातडीने त्याठिकाणी फवारणी करा, असेदेखील सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत रुग्ण वाढू नये यासाठी काळजी घेण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

Advertisement

आम्ही चोवीस तास उपलब्ध

गेल्या काही दिवसामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. त्याबाबत सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. कोणालाही अडचण आल्यास आम्ही त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे, असे मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्पष्ट केले आहे. ज्या परिसरात साथीचे आजार वाढत आहेत. त्या परिसरात फॉगिंग करण्याची सूचना करण्यात आली आहे. कोणालाही अडचण असल्यास आम्हाला थेट संपर्क साधा, असेदेखील मनपा आयुक्तांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.