हुड्डा-शैलजा गटबाजी कारणीभूत
हरियाणात काँग्रेसचे सत्ता स्वप्न भंगले
हरियाणात राजकीय वातावरण स्वत:च्या बाजूने असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसच्या खराब कामगिरीवरून चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या खराब कामगिरीमागे सर्वात प्रमुख कारण हे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांच्यातील मतभेद आहे. हरियाणात कुमारी शैलजा आणि हुड्डा या दोघांनाही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जायचे. हुड्डा हे प्रमुख जाट नेते आहेत आणि ते मागील अनेक वर्षांपासून हरियाणात काँग्रेसचे प्रमुख चेहरे राहिले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीतही हुड्डा हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते, परंतु तरीही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर दुसरीकडे कुमारी शैलजा या हरियाणात दलित राजकारणाच्या प्रमुख चेहरा आहेत. तसेच त्या पाचवेळा खासदार राहिल्या आहेत. शैलजा यांनी पक्षाच्या सभांपासून राखलेले अंतर हा चर्चेचा विषय ठरला होता. हुड्डा यांच्याशी असलेले मतभेद पाहता शैलजा यांनी प्रचारात भाग घेतला नसल्याचे मानले गेले. यामुळे पक्षनेतृत्वालाच हस्तक्षेप करावा लागला होता. भाजपने दलित नेत्यांना काँग्रेसमध्ये सन्मान मिळत असल्याचा आरोप केला.
पक्षनेतृत्वाचा प्रयत्न अपयशी
निवडणुकीदरम्यान हरियाणा काँग्रेसमध्ये गटबाजी दिसून आली होती. पक्षनेतृत्वाला याची कल्पना होती, याचमुळे एका सभेत भूपेंद्र हु•ा आणि शैलजा या एकाच व्यासपीठावर असताना राहुल गांधी यांनी दोघांचा हात पकडून एकजूटतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस पक्षातील गटबाजी पाहता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रचारादरम्यान कुमारी शैलजा यांना भाजपमध्ये सामील होण्याचीच ऑफर दिली होती.